9th December Headlines: कोल्हापुरात आजपासून जमावबंदीचा आदेश, मोदींची महाराष्ट्रातील खासदारांसोबत भेट
Today's 9 December Top Headlines: श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर आज पहिल्यांदाच तिचे वडील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.
मुंबई: कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून 23 तारखेपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारच्या विरोधातील आंदोलन आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच श्रद्धा वालकरच्या हत्याकांडानंतर आज पहिल्यांदाच तिचे वडील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
आज पंतप्रधान मोदींची महाराष्ट्र आणि इतर दोन राज्यांच्या खासदारांशी चर्चा
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि इतर दोन राज्यांच्या खासदारांशी चर्चा करणार आहेत. आज सकाळी महाराष्ट्राचे भाजप खासदार मोदींसोबत अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. सीमावाद, राज्यपालांची वक्तव्यं यावर भाजप खासदार गाऱ्हाणं मांडणार असल्याची माहिती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी आदेश लागू
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. महाविकास आघाडीच्या कर्नाटक सरकार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत. आजपासून म्हणजे 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत हे आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
श्रद्धा वालकरच्या वडिलांची पत्रकार परिषद
दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर आज तिचे वडील विकास वालकर पत्रकार परिषद घेणार आहेत. विकाल वालकर आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आफताबने मे महिन्यात त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर (27) हिचा गळा दाबून हत्या केली होती. या हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करण्यात आले आणि दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या घरी 300 लिटरच्या फ्रीजमध्ये सुमारे तीन आठवडे ठेवण्यात आले. एवढेच नाही तर आरोपी आफताबने श्रद्धाच्या शरीराचे अवयव शहराच्या विविध भागात फेकून दिले होते.
सुरेखा पुणेकर यांची पत्रकार परिषद
आखाती देशात यंदा प्रथमच लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दुबईमध्ये पहिल्यांदाच होणार्या लावणी महोत्सवाबाबत माहिती देण्यासाठी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची पत्रकार परिषद होणार आहे.
आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यवतमाळ दौऱ्यावर
आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित 9 आणि 10 डिसेंबरला यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज दुपारी 3 वाजता मारेगाव येथे शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह इमारत उद्घाटन आणि शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह इमारत भूमीपूजन कार्यक्रम, दुपारी 4 वाजता बोटोणी एकलव्य मॉडेल शाळेचे भूमिपूजन करणार आहेत. अशा विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.