(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाकरेंना घराणेशाही म्हणता, मग श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही हे सिद्ध करा : संजय राऊत
आम्हालाही सुद्धा मराठी असल्याचा अभिमान आहे. दिल्लीच्या गुजराती लॉबीने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही वाकणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी मुकेश अंबानींच्या वक्तव्यावर दिली आहे.
मुंबई : निकालाने घराणेशाही मोडीत निघाली असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) केला. मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पलटवार केला आहे. घराणेशाहीचा अंत म्हणतात तर मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही हे सिद्ध करा, असे संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि यशवंतराव चव्हाणांची (Yashwantrao Chavan) घराणेशाही कधी नव्हती, असे देखील संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, घराणेशाही अंत म्हणतात तर मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही हे सिद्ध करा. सुरुवातीला मतदार संघात माझा मुलगा म्हणून मतं मागितली ना, मग श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? बाळासाहेब ठाकरे आणि यशवंराव चव्हाणांची घराणेशाही कधी नव्हती. आंबेडकरांची घराणेशाही आहे का? त्यांच्या विचार घेऊन लोक पुढे जातात. शिंदे महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे पुरस्कर्ते होते. तुम्ही डरपोक आहे घाबरुन पक्ष सोडला हे मान्य करा.
नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकिल म्हणून काम केलं : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, कालचा निकाल भाजपचे सध्याचे पुढारी आणि अध्यक्ष नार्वेकर यांनी मॅच फिक्सिंग करुन निकाल दिला. न्याय करण्याची जबाबदारी असणाऱ्या नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकिल म्हणून काम केलं.अॅड नार्वेकर शिंदेसाठी निकाल पत्र वाचत होतो
एका बेईमान, चोर, लफंगे, पाकिटमारांच्या निकालाचे वाचन करत होते. प्रत्येक पुरावा त्यांच्यासमोर आणि सर्वोच्च न्यायालयात ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंची नेमणूक चुकीचे आहे, असे नार्वेकर म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवण्याचा प्रकार भाजपने केला. निकालाविरोधत आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. सत्य आणि न्यायाचा विजय होईल. जल्लोष करणारे आणि डानस करणाऱ्यांनी अंतर आत्म्याला विचारावं निर्णय खरा की खोटा आहे. शिवसेना अशा अनेक संकटातून उजळून निघाली आहे .
मणिपुरातही शिवसेना जाणार तेथील मंदिरातही मोदींनी जावं : राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. म्हणजे निवडणुका जवळ आल्या आहेत. उद्या ते नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत. जिथे शिवसेना जाणार तिथे मोदी जात आहेत. मणिपुरातही शिवसेना जाणार तेथील मंदिरातही मोदींनी जावं, असा टोला संजय राऊतांनी मोदी दौऱ्यावर लगावला आहे.
दिल्लीच्या गुजराती लॉबीने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही वाकणार नाही : संजय राऊत
व्हायब्रंट गुजरात या ग्लोबल समिटमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एका वक्तव्यांवर महाराष्ट्रात आक्षेप घेतला जातोय. रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम गुजराती कंपनीच राहणार, असे विधान रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये केले. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, आम्हालाही सुद्धा मराठी असल्याचा अभिमान आहे. दिल्लीच्या गुजराती लॉबीने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही वाकणार नाही.