ST Bus : कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय
Maharashtra Bus : कर्नाटकमध्ये जाणाऱ्या महाराष्ट्रातील बस आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या अशी मागणी सर्व चालक-वाहकांनी केली होती.

मुंबई : कोल्हापुरातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या सर्व बस फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे आदेश दिले आहेत. कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्रातील एसटी चालकाला मारहाणीची घटना घडल्यानंतर हा आदेश दिला आहे. या घटनेचा निषेध करत एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीर असल्याची ग्वाही परिवहन मंत्र्यांनी दिली.
कर्नाटकात चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी मंडळाच्या एसटी बससह चालकाच्या तोंडाला काळं फासल्याची धक्कादायक घटना घडली. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चालकाला मारहाण करत तोंडाला काळं फासलं. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येतं का? अशी विचारणा करत त्याला मारहाण करण्यात आली. चित्रदुर्ग जवळील ऐमंगळ टोल नाक्याजवळ हा प्रकार घडला. या घटनेमध्ये जखमी झालेल्या चालकाला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.
या घटनेच्या आधी काही वेळापूर्वीच बेळगावात एका एसटी कंटक्टरला मारहाण करण्यात आली होती. कंटक्टरला मराठी येत नसल्याने काही तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप होत होता. पण नंतर एका तरूणीशी गैरवर्तन केल्यावरून ही मारहाण झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी कर्नाटक बसच्या वाहकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीवर बोलून त्यांना धीर दिला. या प्रकरणात तुम्ही एकटे नसून, आपले सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे अशी ग्वाही देखील दिली. तसेच कर्नाटक शासन या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत आपल्या शासनाशी चर्चा करत नाही तोपर्यंत त्या भागातील महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात येतील असे निर्देश देखील त्यांनी एसटी महामंडळाला यावेळी दिले.
कोल्हापूर, पुण्यामध्ये पडसाद
या घटनेचे पडसाद पुण्यासह कोल्हापुरात देखील उमटल्याचं बघायला मिळालं. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी कर्नाटकातील बसेलला आंदोलकांनी काळं फासत निषेध नोंदवला. यापुढे असा प्रकार घडल्यास बसेस जाळू असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. पुण्यातील स्वारगेटवरही अशाच प्रकारे कर्नाटकातील बसला काळं फासण्यात आलं.
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी यावर कडक भूमिका घेणार असल्याचं सांगितलं होतं. आता त्यांनी कोल्हापूरहून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
