दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच? रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, महायुतीत नेमकं चाललंय काय?
Nashik & Raigad Guardian Minister : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशन संपले तरी रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्र्यांशिवायच असल्याचे पाहायला मिळत आहे.

Nashik & Raigad Guardian Minister : 18 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रिपदांची घोषणा केली होती. नाशिक जिल्ह्यासाठी भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडमध्ये अजित पवार गटाच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे समर्थक थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, टायर जाळून रस्ता अडवला. तर नाशिकमध्ये देखील मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर अवघ्या एक दिवसातच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आता महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशन संपले तरी रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्र्यांशिवायच असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय शिंदे आणि पवारांच्या कोर्टात
गेल्या तीन महिन्यांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद सुरूच आहे. महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. मात्र, अजूनही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात गेला आहे. दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
नाशिकचे पालकमंत्री पद भाजपकडेच राहणार; सूत्रांची माहिती
तर, नाशिकबद्दल बोलायचे झाले तर नाशिकचे पालकमंत्रिपद हे भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्या देखरेखीखाली जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाजपकडून नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत आग्रही भूमिका घेण्यात आल्याचे दिसून येते. मात्र नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकचा पालकमंत्री लवकरच जाहीर करू : देवेंद्र फडणवीस
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नाशिक शहरातील युवा उद्योजकांसोबत चर्चा सत्रात सहभाग घेतला होता. या चर्चासत्रात देवेंद्र फडणवीस यांना युवा उद्योजकांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या तिढ्याबाबत प्रश्न विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर होत नाही, तोपर्यंत चार्ज मुख्यमंत्र्यांकडे असतो. पण लवकरच नाशिकचा पालकमंत्री जाहीर करू, असे वक्तव्य केले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
