लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी; मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा
Latur News : तालुक्याची मागणीवर गांभीर्याने विचार न झाल्यास, तीव्र आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
Latur News : लातूर (Latur) जिल्ह्यातील औराद शहाजानी (Aurad Shahajani) हे गाव महाराष्ट्र- कर्नाटक सीमारेषेवरील एक मोठा गाव म्हणून ओळखला जातो. औराद शहाजानी येथे मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. पंचक्रोशीतील अनेक गावांचा राबता औराद शहाजानी कडेच असतो. तर, मागील 25 वर्षापासून औरादकर तालुका निर्मितीसाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, औरादकरांनी एकत्र येत आज या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. औराद शहाजानी तालुक्याची निर्मिती झालीच पाहिजे, यासाठी संघर्ष उभा करणार असल्याचा यावेळी एकमताने ठराव घेण्यात आला. तसेच, सर्व पक्षीय आणि विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच व्यापारी यांनी एकत्रित येत औराद शहाजानी तालुका निर्मिती संघर्ष समितीच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी कार्यालय निलंगा यांना निवेदन देण्यात येणार आहे. तर, या मागणीवर गांभीर्याने विचार न झाल्यास, तीव्र आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी गावला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. लातूर जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेलं आणि लोकसंख्या वीस हजारांच्या आसपास औराद शहाजानी गावाला तालुक्याचा दर्जा देणं नैसर्गिक न्यायानुसार ठरेल असा दावा करण्यात येत आहे.
तर, कृषी मंडळात 49 गावांचे कार्यक्षेत्र आहे. महावितरणचे 15 गावांचे कार्यक्षेत्र असणारे कार्यालय आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालये व वरिष्ठ महाविद्यालये, डी. एड. कॉलेज आहेत. कापड, सराफा, किराणाची मोठी व्यापारपेठ, दोन ऑईल मिल, चार दाळमिल, इतर अनेक छोटे-मोठे लघुउद्योग, 500 पेक्षा अधिक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. कर्नाटकच्या सीमा भागातील किमान 70 गावांचे दैनंदिन व्यवहार येथे आहेत. जलविज्ञान प्रकल्प, हवामान केंद्र, भूकंप मापक केंद्र, अंगणवाडी उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, अनेक सुसज्ज खाजगी रुग्णालये, दूरसंचार कार्यालय, विभागीय पोस्ट कार्यालय अशा सुविधा आहेत. त्यामुळे या गावाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे.
जोरदार घोषणाबाजी केली
औराद शहाजानी तालुका होण्यासाठी भौगोलिकदृष्ट्या कोणतीही अडचण नाही, त्यामुळे मागच्या 20 वर्षांपासून येथील नागरिकांची देखील अशीच मागणी करत आहे. दरम्यान, याच मागणीसाठी आज औरादकरांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच औराद शहाजानी तालुक्याची निर्मिती झालीच पाहिजे, यासाठी संघर्ष उभा करणार असल्याचा यावेळी एकमताने ठराव घेण्यात आला. त्यामुळे आगामी काळात औराद शहाजानी तालुका करण्याची मागणी जोर धरु शकते.
इतर महत्वाच्या बातम्या: