Mahadev Koli : हजारो महादेव कोळी बांधवांचा जलसमाधीचा इशारा, मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय
Mahadev Koli Tribe Protest : महादेव कोळी बांधवाच्या मागण्यांवर या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही बैठक झाली होती. पण समाजाच्या हाती अद्याप काही लागलं नसल्याने नाराजीचा सूर आहे.

लातूर : स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव एकीकडे साजरा होत असताना परत एकदा मराठवाड्यातील सकल आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीने जल समाधी आंदोलन सुरू आहे. हजारो समाजबांधव शिरूर ताजबंदच्या तळ्यावर उपस्थित राहिले.
महादेव कोळी समाजाच्या मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी वेळोवेळी अर्ज विनंती करण्यात आली होती. आंदोलनही करण्यात आलं होतं. मात्र आश्वासनापलीकडे काही मिळत नाही. यामुळे ठाम निर्धार करत समाज बांधवांनी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंदच्या शेततळ्यात जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
काही दिवसापूर्वी निलंगा तालुक्यात अशा स्वरूपाचा आंदोलन समाज बांधवांकडून करण्यात आलं होतं. त्यानंतर लेखी आश्वासन देत लवकर विषय मार्गी लावू असं सांगण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठकीही पार पडली. मात्र हाती काही लागलं नाही. या सर्वाचा परिणाम म्हणून आज हे आंदोलन करण्यात येत आहे.
टीआरटीआय संस्थेवर नॉनट्रायबल अधिकारी नेमणूक करण्यात जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या उपलब्ध करून द्यावे या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. याबाबतचा ठोस निर्णय प्रशासन जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत पाण्याच्या बाहेर निघणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
महादेव कोळी समाजातील स्त्री पुरुष आबालवृद्ध यांनी आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र अद्याप प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी इकडे फिरकलेच नाहीत. यामुळे आंदोलनकर्ते संतप्त आहेत.
काय आहेत मागण्या? (Demands Of Mahadev Koli Tribe)
1) विनाअट आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी चे जातीचे दाखले कोळी नोंदीवरून सरसकट मिळावेत.
2) ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्रं न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे.
3) आदिवासी संचालक कै. गोविंद गारे आणि मधुकर पिचड यांच्या निकषानुसार समान न्यायाने विस्तारित क्षेत्रातील कोळी, महादेव कोळी, मल्हार जमातीला जातवैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.
4) जात पडताळणी समितीच्या वतीने सुरू असलेली तपासणी तात्काळ थांबवावी.
5) शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वैधताबाबत काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्यात यावे.
6) तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यानी निर्गम उतारा व पालकांची जात प्रमाणपत्र या पुराव्यावरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

