(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Train Accident in History: ममता, नितिश की लालू प्रसाद? कोणाच्या कार्यकाळात सर्वाधिक रेल्वे अपघात, पण एकानेच दिला होता राजीनामा
Train Accident in History: ओडिशा रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.पण याआधीच्या रेल्वेमंत्र्यांच्या कार्यकाळात रेल्वेची परिस्थिती कशी होती?
Train Accident in History: ओडिशामधील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातावर (Railway Accident) संपूर्ण देशभरातून पडसाद उमटत आहेत. या रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला तर 900 पेक्षा अधिक लोकं गंभीर जखमी आहेत. या अपघाताची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल लवकरच सादर करण्यात येईल असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. ओडिशातील रेल्वे अपघातामुळे रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सध्या विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याआधी चर्चेत राहिलेल्या तीन रेल्वेमंत्र्यांच्या कार्यकाळाविषयी जाणून घेऊया.
ममता बॅनर्जी (Mamta Banerjee)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जेव्हा पहिल्यांदा रेल्वेमंत्री म्हणून कार्यभार हाती घेतला तेव्हा देशात एनडीएचे सरकार होते. 1999मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना रेल्वे खात्याची जबाबदारी दिली होती. 2009 मध्ये त्यांना दुसऱ्यांदा रेल्वेचे मंत्रीपद सांभाळण्याची संधी मिळाली होती. तेव्हा मनमोहन सिंह यांचे सरकार होते. ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात एकूण 54 रेल्वे अपघात झाले होते. तर या अपघातामध्ये एकूण 1451 लोकांचा मृत्यू झाला होता. याचबरोबर ममता यांच्या कार्यकाळात रेल्वे रुळावरुन घसरण्याच्या 839 घटना घडल्या होत्या.
नितीश कुमार (Nitish Kumar)
बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नेते नितीश कुमार यांना देखील पहिल्यांदा अटलजींच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. नितीश कुमार यांच्या पहिल्याच कार्यकाळात 1999 मध्ये पश्चिम बंगालमधील गैसलमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातामध्ये 285 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची नैतिक जबाबदारी घेत त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला होता. विशेष म्हणजे या रेल्वे अपघातामुळे फक्त दोन मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामध्ये पहिल्यांदा लाल बहादूर शास्त्री यांचा समावेश होता.
2001 मध्ये नितीश कुमार यांना पुन्हा एकदा रेल्वेमंत्री पदाची जबाबदारी मिळाली होती. त्यांच्या या कार्यकाळात एकूण 79 रेल्वे अपघात झाले होते ज्यामध्ये 1527 लोकांचा मृत्यू झाला होता. नितीश कुमार यांच्या कार्यकाळात रेल्वे रुळावरुन घसरण्याच्या 1000 घटना घडल्या होत्या.
लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)
मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्री करण्यात आले होते. त्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्या कार्यकाळात झालेल्या अपघातांच्या तुलनेत लालू प्रसाद यादव यांच्या काळात कमी अपघात झाले आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळात एकूण 51 अपघातांच्या घटना घडल्या होत्या आणि त्यामध्ये 1159 लोकांनी आपले प्राण गमावले होते. हा आकडा ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्या कार्यकाळाच्या तुलनेत फार कमी असल्याचं म्हटलं जातं. रेल्वे रुळावरुन घसरण्याच्या देखील फार कमी घटना लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झाल्या आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या काळात एकूण 550 रेल्वे रुळावरुन घसरण्याच्या घटना घडल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'कॅग' अहवालाला दुर्लक्षित करण्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे?', प्रियांका गांधींचा मोदी सरकारला सवाल