Electricity Workers Strike : राज्यासह देशभरातील वीज कर्मचारीही संपावर; राज्य सरकारचा मेस्माचा इशारा, प्रमुख मागण्या काय?
Electricity Workers Strike : खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप. देशभरातले वीज कर्मचारी आजपासून संपावर.

Electricity Workers Strike : आजपासून देशभरातले वीज कर्मचारी संपावर जाणार आहेत. वीज कंपन्यांचं खासगीकरण आणि विभाजनाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या 39 संघटना संपावर ठाम आहेत. जवळपास 85 हजार कर्मचाऱ्यांनी ही संपाची हाक दिली आहे. राज्यातल्या प्रमुख शहरांमधील वीज कंपनीच्या कार्यालयासमोर कर्मचारी सभाही घेणार आहेत. दरम्यान वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास राज्य सरकारनं मनाई केली आहे. संपावर गेल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारनं दिला आहे.
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
- महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांत सुरू करण्यात येत असलेले खाजगीकरण त्वरित थांबवा
- केंद्र सरकारच्या विद्युत (संशोधन) बिल 2021 खाजगीकरण धोरणाला विरोध
- तिन्ही वीज कंपन्यांत 30 हजार कंत्राटी आणि बाहयस्त्रोत कामगार यांना वयाच्या साठ वर्षापर्यंत नोकरीत संरक्षण प्रदान करा
- महानिर्मिती कंपनी संचलित करीत असलेले जलविद्युत केंद्र खाजगी उद्योजकांना देण्याचे धोरण त्वरित थांबवा
- तिन्ही कंपन्यातील रिक्त पदे भरण्यास होत असलेल्या दिरंगाई विरुद्ध
- तिन्ही कंपन्यातील कर्मचारी अभियंते व अधिका-यांच्या बदली धोरणावर एकतर्फी निर्णया विरुद्ध
- चारही कंपन्यातील वरिष्ठ पदावरील अनावश्यक भरती, बदल्या यांतील राजकिय हस्तक्षेप या प्रश्नाकरिता व खाजगीकरण धोरणाविरुद्ध
दरम्यान, तुमच्या घरातील वीजेसंदर्भात काही तक्रार असेल तर त्यावर आज तोडगा निघू शकणार नाही. कारण एसबीआय वगळून राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी आणि राष्ट्रीय कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली आहे. कामगार कायदे आणि खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. देशभरातील 5 लाखांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवस्था कोलमडणार आहे. तर तिकडे मध्यरात्रीपासून महाराष्ट्रासह देशभरातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. वीज कंपन्यांचं खासगीकरण आणि विभाजनाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास राज्य सरकारनं मनाई केली आहे. संपावर गेल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारनं दिला आहे. तर तिकडे विमा क्षेत्रातील कर्मचारीही आंदोलन करणार आहेत. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी मुंबईतील एलआयसी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. संप आणि आंदोलनांमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
