पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे
Mahadji Shinde Rashtriya Gaurav Award : महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने गौरवण्यात येत आहे हे आपल्यासाठी अभिनास्पद असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

नवी दिल्ली : शरद पवारांनी टाकलेली गुगली ही कुणालाही समजत नाही, बाजूला बसलेल्यांना आणि बाजूला बसवणाऱ्यांनाही ती समजत नाही. पण पवार साहेब मला कधीही गुगली टाकणार नाहीत असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राजकारणात नातं कसं जपायचं हे पवार साहेबांकडून शिकावं असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा'ने सन्मान कऱण्यात आलं. पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थिती होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होत आहे. त्या निमित्ताने सरहद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला. पाच लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
'शिंदें'चे जावई पवारांच्या हस्ते शिंदेंचा गौरव
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महादजी शिंदे या पुरस्काराने आपल्याला गौरवण्यात येत आहे. यावेळी स्टेजवर ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित आहेत आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येत आहे ते शरद पवार हे क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे जावई आहेत.
पवार आपल्याला कधीही गुगली टाकणार नाहीत
एकनाथ शिंदे म्हणाले की, "शरद पवारांचे सासरे सदाशिव शिंदे हे क्रिकेटमध्ये गुगली टाकायचे. तर पवार साहेबांनी राजकारणात टाकलेली गुगली अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांनाही त्यांची गुगली कळत नाही. माझ्याबद्दल थोडं वेगळं सांगतो. माझे पवार साहेबांशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी मला कधीही गुगली टाकली नाही, यापुढेही टाकणार नाहीत हे नक्की."
राजकारणात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. वेगवेगळी विचारधारा असली तरी त्यांच्याशी संबंध जपावे लागतात. राजकारणात नातं कसे जपायचं हे पवार साहेबांकडून शिकावं असं एकनाथ शिंदे म्हणाले.
महादजी शिंदे पुरस्कार हा अभिमानास्पद
आपल्याला महादजी शिंदे पुरस्काराने गौरवण्यात येत आहे हे अभिमानास्पद आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, "महादजी शिंदे यांनी पानिपतमध्ये पराभव झाल्यानंतर अवघ्या 10 वर्षांत दिल्लीवर भगवा भडकवला. 10 फेब्रुवारी रोजी या पराक्रमाला 254 वर्षे पूर्ण झाले. अटक ते कटक पर्यत त्यांनी मराठ्यांचा भगवा फडकवला. त्यांनी खऱ्या अर्थाने सगळ्यांना एकत्र आणलं. त्यांचं कर्तृत्व हे लोकांसमोर आलं पाहिजे. आपल्यासाठी हा पुरस्कार म्हणजे सोन्याचे सलकडे आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी अभिमान आहे. माझ्यावर माया असलेल्या हजारो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्त्यांचा आहे."
कमी वेळेत चांगलं काम केलं
एकनाथ शिंदे म्हणाले की, "आपण कधीही राजकारणात पातळी सोडून टीका केली नाही. आपल्यावर अनेक आरोप करण्यात आले, पण त्याला कामाने उत्तर दिलं. मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर हाताशी वेळ कमी आहे हे जाणवलं होतं. त्यामुळेच पायाला भिंगरी लाऊन काम केलं. विकासकामांचा आणि कल्याण कामांचा धडाका सुरू केला."
ही बातमी वाचा:




















