Devendra Fadanvis : गडचिरोलीत सुरजागड इस्पातची 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांना यश
Gadchiroli : सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गडचिरोलीमध्ये 10,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सातत्याने पाठपुराव्याला यश आले असून सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. विदर्भ विशेषत: गडचिरोलीसाठी ही मोठी उपलब्धी आहे.
सुरजागड इस्पात प्रा. लि.चे अध्यक्ष सुनील जोशी यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळी याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 8000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पात जागतिक दर्जाचे उत्पादनविषयक तंत्रज्ञान राहणार असून, पर्यावरण रक्षण हा त्याचा मुख्य गाभा असेल. त्यामुळे हा संपूर्णत: पर्यावरणपूरक स्टील प्रकल्प राहणार आहे अशीही माहिती यावेळी सुनील जोशी यांनी दिली.
गडचिरोलीच्या विकासासाठी प्रयत्नशील
गडचिरोलीच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून, या भागात रोजगार निर्मितीसाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न होत आहेत. गडचिरोली हे देशाचे पोलाद हब होण्याची क्षमता आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, अशी हमी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुनील जोशी हे दावोस परिषदेत सुद्धा सहभागी होणार असून, तेथे ते राज्य सरकारसोबत सामंजस्य करार सुद्धा करणार आहेत.
गडचिरोलीत विविध पायाभूत सुविधा प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी, यासाठी नेहमीच देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार राहिला आहे. कोनसरी येथे एका प्रकल्पाचे उदघाटन आणि दुसर्या टप्प्याचे भूमिपूजन सुद्धा लवकरच होणार आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना या कोनसरी प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. आता या नव्या गुंतवणुकीतून गडचिरोली आणि पर्यायाने विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
सुरजागड नक्षलवाद्यांच्या नियंत्रणातून मुक्त
गडचिरोली जिल्ह्यात एकेकाळी नक्षलवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या एटापल्ली तालुक्यात सुरजागड टेकड्या आहेत. घनदाट जंगल असलेल्या या उंच टेकड्यांच्या पोटात देशातील सर्वात उच्च प्रतीचे कोट्यावधी टन लोह खनिज दडलेले आहे. हा शोध काही आता लागलेला नाही तर 1960 पासून खनिज संशोधन संस्थांच्या अहवालात ही माहिती उपलब्ध होती. मात्र गडचिरोलीतील नक्षलवादामुळे पाय ठेवणे ही शक्य नव्हते. 2015 मध्ये सरकारने सुरजागडमध्ये लोह खनिजाच्या उत्खननाचा निर्णय घेतला. काम सुरु होताच 2017 मध्ये नक्षलवाद्यांनी सुरजागडजवळ कंत्राटदारांच्या शंभर पेक्षा जास्त गाड्या जाळून टाकल्या आणि पुन्हा एकदा काम थांबले.
सुरजागड सुरक्षित करण्यासाठी पोलिसांनी खास रणनीती राबविली. सर्वात आधी सुरजागडच्या परिसरात असणाऱ्या हेडरी, येलचिल, अलदांडी, पिपली बुर्गी आणि सुरजागड या ठिकाणी नवे पोलीस मदत केंद्र उभारले. संपूर्ण परिसरात नक्षलवाद्यांचा नाही तर पोलिसांचा दबदबा निर्माण झाला आणि सुरजागड नक्षलवाद्यांच्या नियंत्रणातून मुक्त झाले.