(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abdul Sattar: विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होताच अब्दुल सत्तार 'नॉट रीचेबल'
Abdul Sattar: सत्तार सद्या आपल्या नागपुरातील आपल्या निवासस्थानी देखील नसल्याचे समोर आलंय.
Abdul Sattar: विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्यानंतर आता सत्तार कुठे आहेत याची चर्चा पाहायला मिळत आहे. सतार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच ते 'नॉट रीचेबल' असल्याचे समोर आले आहे. सत्तार सद्या आपल्या नागपुरातील आपल्या निवासस्थानी देखील नसल्याचे समोर आलंय. त्यामुळे आता सत्तार यांची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे.
नागपूर येथील भूखंड घोटाळा आणि कृषी महोत्सवाच्या नावाने पैसा जमा करण्यात येत असल्याच्या आरोपानंतर विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. तर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांनी केली आहे. त्यामुळे सत्तार यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. असे असतानाच अब्दुल सत्तार नॉट रिचेबल असल्याने याबाबत आणखीनच चर्चा रंगत आहे.
Abdul Sattar Resignation : सातारांच्या राजीनाम्याची मागणी!
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर नागपूर येथील भूखंड घोटाळ्याचा आरोप होत आहे. त्यातच त्यांच्या सिल्लोड मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना पैसे जमा करण्याचे टार्गेट देण्यात आल्याचे देखील आरोप होतोय. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. तर राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या, अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे. गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को, 50 खोके एकदम ओके, सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके, अशा घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरत खाली बसून जोरदार निदर्शने केली.
अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता...
नेहमी कोणत्या-कोणत्या कारणांनी चर्चेत राहणारे अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपावरून चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या सत्तार यांच्यावर आता जमीन घोटाळ्याचा आरोप होतोय. सोबतच त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात होणाऱ्या कृषी प्रदर्शनासाठी कृषी विभागात पैसे वसूल करण्यात येत असल्याचा आरोपही सत्तार यांच्यावर करण्यात आला आहे. तर या सर्व प्रकरणावरून विरोधक आक्रमक होतांना दिसत आहे. तर सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील यावेळी करण्यात येत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.