
आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा 30 टक्के पगार कपात करणार, औरंगाबाद जिल्हा परिषदेत ठराव मंजूर
औरंगाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे काही कर्मचारी आणि अधिकारी आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत अशा तक्रारी आल्या होत्या. काही तक्रारी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असल्याचे समोर आलं होतं.

औरंगाबाद : आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा 30 टक्के पगार कपात करण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे. औरंगाबादच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत कार्यरत काही अधिकारी, कर्मचारी आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत, त्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत, अशा तक्रारी प्राप्त झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी सर्वसाधारण प्रस्ताव मंजूर केला आहे.
जिल्हा परिषदेचे जे अधिकारी, कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत. त्यांची चौकशीअंती पगारातून 30 टक्के पगार कपात करुन आई-वडिलांच्या खात्यात वळती करण्याचा ठराव सभागृहात सर्वानुमते पारित झाला. औरंगाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे काही कर्मचारी आणि अधिकारी आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत अशा तक्रारी आल्या होत्या. काही तक्रारी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असल्याचे समोर आलं होतं. त्यावर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांनी आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा 30 टक्के पगार कपात करण्याचा ठराव मांडण्याचा निर्णय घेतला.
मिना शेळके सभागृहात बोलताना दिसत नाहीत. मात्र त्यांनी पोटतिडकीने आज हा प्रस्ताव मांडला. एवढेच नाही तर त्यांनी सभागृहात जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या आई-वडिलांना सांभाळण्याची भावनिक सादही घातली. सर्व सभागृहातील उपस्थित सदस्यांनी टाळ्या वाजून अनुमोदन दिलं. ही बाब जरी सकारात्मक वाटत असली तरी देखील सभागृहात अशा प्रकारचे प्रस्ताव येण्याची वेळ यावी हे विचार करायला लावणारं आहे. मात्र या प्रस्तावाची अत्यंत कडकपणे अंमलबजावणी झाली झाली तर याचा परिणाम सकारात्मक पाहायला मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
