(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar Drought : पावसानं ओढ दिल्यानं अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळाची चिन्ह; 52 मंडळात 21 दिवसांपासून पाऊसच नाही
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दुष्काळाची चिन्हे दिसू लागली असून जिल्ह्यातील 52 मंडळात 21 दिवसांपासून पाऊस बरसलेला नाही.
अहमदनगर : राज्यातील काही भागात पावसाने दडी मारल्याने त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकटाचा डोंगर उभा ठाकला आहे. नाशिकसह (Nashik) अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दुष्काळाची चिन्हे दिसू लागली असून जिल्ह्यातील 52 मंडळात 21 दिवसांपासून पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे पावसाने मारलेली दडी आणि दुष्काळाची टांगती तलवार अशा दुहेरी संकटामध्ये बळीराजा (farmers) सापडला आहे. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करुन मदत करण्याची मागणी सध्या शेतकऱ्यांकडून केली जाते आहे. तसंच प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना सुरू करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड (Rain) असून तालुक्यात शेती पिके अडचणीत सापडली आहेत. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांकडून त्या भागामध्ये दुष्काळ जाहीर करावा आणि सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन देखील कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचे पाहणी करणारी सर्वेक्षण समिती नेमण्यात आली असून या समितीकडून 22 तारखेपासून अनेक तालुक्यांमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आलेला आहे. शेवगाव, पाथर्डी, पारनेर या भागामध्ये या सर्वेक्षण समितीकडून पाहणी सध्या सुरू करण्यात आहे. या समितीमध्ये कृषी विभाग, महसूल विभाग, विमा कंपनीचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
दरम्यान, ज्या भागांमध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड आहे, अशा भागांचे सर्वेक्षण केलं जात आहे. एकूण महसूल मंडळातील 5 टक्के क्षेत्राचं सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून केलं जात आहे. सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून कालपर्यंतची आकडेवारी बघितली असता जवळपास 52 मंडळामध्ये सलग 21 दिवस पाऊस झालेला नाही तर 36 मंडळामध्ये 15 ते 20 दिवस सलग पावसाने खंड दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर 25 टक्के विम्याची आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाऊले उचलली जात आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाने खंड दिल्याने शेती पिकेही अडचणीत सापडली असून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने पावलं उचलण्यात आलेली आहेत.
धुळे शहरावरही पाणी संकट
धुळे शहराला (Dhule) पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने तलावामध्ये सध्या फक्त 8 टक्के जलसाठा शिल्लक आहे. एरव्ही दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी भरलेलं असतं. मात्र यंदा ऑगस्ट महिना संपून देखील अद्यापही नकाने तलावाच्या परिसरातील आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा पूर्णपणे कोरडा ठाक असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. 8 टक्के असलेला पुढील किती दिवस पुरेल हा मात्र प्रश्न असला तरी येत्या काळामध्ये धुळे शहरातील नागरिकांवर पाणीसंकट हे गडद होत जाणार हे मात्र नक्की. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
कुठे अल्लाहकडे दुवा, तर कुठे महादेवाला अभिषेक; पावसासाठी आता थेट देवालाच साकडं