मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या, विधानसभा महिला संघटक आणि माजी नगरसेवक राजुल पटेल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांनाच वेध लागले ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिका निवडणुकांचे. विशेष म्हणजे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून महापालिका निवडणुकांची तयारी देखील सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे उमेदवार देण्याची घोषणाच खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे, महापालिका निवडणुकांसाठीची मोर्चबांधणी सुरू झाली असून आजच पुण्यात बैठक घेण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही कंबर कसली असून ऑपरेशन टायगर सुरू केल्याचं मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्या अनुषंगाने ठाकरे गटाला धक्का देत काही नेत्यांचा हाती शिवधनुष्य देऊन उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का दिला जात आहे. त्यातच, आता आगामी महापालिका निवडणुकांपूर्वीच ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. आता, महिला उपनेत्यानंच ठाकरेंची साथ सोडली असून लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या, विधानसभा महिला संघटक आणि माजी नगरसेवक राजुल पटेल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून यावेळी उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांच्याऐवजी हारून खान यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. राजुल पटेल ह्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यरत होत्या, त्याशिवाय त्यांनी 2019 साली विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. त्यामुळे, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, वर्सोवा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असून या मतदारसंघात राजूल पटेल यांचं राजकीय वजन आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांपासून त्या नाराज असल्याने महापालिका निवडणुकांचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं बोललं जात आहे.
निवडणुकांच्या तोंडावरच ठाकरेंना दे धक्का
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेला अनेक राजकीय धक्के बसत आहेत. त्यामध्ये, काही दिवसांपूर्वीच सावंतवाडी येथील तालुका प्रमुखाने ठाकरेंची साथ सोडली असून माजी आमदार राजन साळवी हेही ठाकरेंच साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे जालना व संभाजीनगर जिल्ह्यातही ठाकरेंना धक्का देत काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंना मोठं आव्हान असणार आहे.
हेही वाचा
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई