Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Delhi Election : 14 जानेवारी रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी राजधानी दौऱ्यावर असताना एक व्हिडिओ शेअर केला होता. घाणेरडेपणा दाखवत त्यांनी केजरीवालांना टोमणा मारला होता
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने (AAP) सोमवारी दिल्लीकरांसाठी 15 हमी जाहीर केल्या. पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी 2020 मध्ये यमुना स्वच्छ करण्याचे, दिल्लीचे रस्ते आणि युरोपप्रमाणे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याबद्दल माफीही मागितली.केजरीवाल म्हणाले की, 'आज मी कबूल करतोय की, गेल्या 5 वर्षांत मी ही आश्वासने पूर्ण करू शकलो नाही. कोरोना अडीच वर्षे टिकला, त्यानंतर त्यांनी (केंद्र सरकार) जेल-जेलचा खेळ खेळला. माझी संपूर्ण टीम विखुरली. पण आता आपण सगळे तुरुंगाबाहेर आलो आहोत. तिन्ही गोष्टी दिल्लीत व्हाव्यात, असे माझे स्वप्न आहे. येत्या 5 वर्षात हे काम पूर्ण करू. यासाठी आमच्याकडे निधी आणि योजनाही आहे.
त्यांचे सरकार आल्यास दिल्लीत मोफत योजना बंद
दिल्लीत 24 तास मोफत वीज, मोफत पाणी, मोफत शिक्षण, वृद्धांसाठी मोफत तीर्थयात्रा, महिलांसाठी मोफत बस प्रवास, हॉस्पिटल-मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत उपचार सुरूच राहणार आहेत. ते म्हणाले की, भाजपचे नेते आणि प्रवक्त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले आहे की, त्यांचे सरकार आल्यास दिल्लीत मोफत योजना बंद केल्या जातील.
कमळाचे बटण दाबले तर चारी बाजूला चिखल
केजरीवाल म्हणाले की, कमळाचे बटण दाबल्यास दरमहा 25 हजार रुपये अतिरिक्त खर्च होतील. एवढी बचत आपल्या सरकारमुळे होत आहे. 25,000 रुपयांचा भार उचलण्यास गरीब माणूस सक्षम आहे असे मला वाटत नाही. अनेकांना दिल्ली सोडावी लागेल. मतदानावेळी कमळाचे बटण दाबले तर सगळीकडे चिखल होईल.
केजरीवालांनी माफी का मागितली?
यमुना नदीचे प्रदूषण हा दिल्लीतील निवडणुकीचा मोठा मुद्दा आहे. अरविंद केजरीवाल यांनी 2020 च्या निवडणुकीत नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 5 वर्षानंतरही यमुना स्वच्छ होऊ शकली नाही. दरवर्षी छठ उत्सवात यमुनेच्या पांढऱ्या फेसावरून बरेच राजकारण होते. 25 जानेवारी रोजी भाजप नेते प्रवेश वर्मी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कटआउटचे यमुनेत विसर्जन केले होते. केजरीवाल यांच्या कटआउटवर लिहिले होते की, मी नापास झालो, कृपया मला माफ करा. कटआउटमध्ये केजरीवाल कान पकडून होते. या मुद्द्यांवर भाजपसह इतर पक्ष सतत 'आप'ला कोंडीत पकडत आहेत.
14 जानेवारी रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी राजधानी दौऱ्यावर असताना एक व्हिडिओ शेअर केला होता. घाणेरडेपणा दाखवत त्यांनी केजरीवालांना टोमणा मारला होता आणि म्हटले होते की, ही केजरीवाल यांची चमकणारी दिल्ली आहे, पॅरिससारखी दिल्ली आहे.
दिल्लीत 70 जागांवर 5 फेब्रुवारीला मतदान
दरम्यान, दिल्लीत 70 जागांवर 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत एकूण 70 जागांवर 699 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. 20 जानेवारी ही नावे मागे घेण्याची शेवटची तारीख होती. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, निवडणुकीसाठी 1522 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. नवी दिल्ली मतदारसंघात आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात 22 उमेदवार नशीब आजमावत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या