पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
बीड पोलिसांनी मागील महिनाभरात जिल्हाभरात दहशत माजविणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन सध्या बीड(Beed) जिल्हा राज्यात चर्चेत असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी अनेक जिल्ह्यात मोर्चेदेखील काढण्यात आले. या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडेंचे निकवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचेही नाव राज्यभरात चर्चेत आले असून खंडणी व खून प्रकरणात त्यांच्यावर आरोप होत आहेत. वाल्मिक कराडचे पोलिसांशी (Police) हितसंबंध असून पोलिसांकडूनच त्याला बळ देण्यात येत असल्याचेही आरोप जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केले आहेत. दरम्यान, खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर त्याच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून बीडमधील आणखी एका गँगकवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. डिसेंबर महिन्यात गोळीबार करणाऱ्या आठवले गॅंगवर देखील पोलिसांनी आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी शितल बल्लाळ यांच्यावर आरोप करत ऑडिओ क्लीप व्हायरल करणाऱ्य सनी आठवलेची ही आठवले गँग आहे.
बीड पोलिसांनी मागील महिनाभरात जिल्हाभरात दहशत माजविणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. वाल्मिक कराडशी जवळीस असलेल्या सुदर्शन घुले याच्या गँगवर मकोका लावल्यानंतर आज बीड पोलिसांनी आठवले गॅंगवर देखील मकोकाची कारवाई केलीय. 13 डिसेंबर 2024 मध्ये पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबारची घटना घडली होती. त्यातील सहा आरोपींवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांचा समावेश आहे. या आरोपींनी आतापर्यंत 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आता आठवले गँगवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि सनी आठवले याची कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. याच आठवलेवर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, सनी आठवलेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन भलीमोठी पोस्ट करत एक ऑडिओ क्लीप व्हायरल केली होती. त्यामध्ये, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराडचे संभाषण असून कराडच्या सांगण्यावरुन पोलीस कामकाज करत असल्याचा आरोपी सनी आठवलेने केला होता. आता, त्याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
टोळ्यांची माहिती घेऊन कारवाई होणार - कावत
ज्या ठिकाणी गंभीर गुन्हे घडत आहेत. त्या ठिकाणी मकोका प्रस्ताव पाठवला जाणार आहे. तसेच गंभीर स्वरूपातील गुन्हेगाराची पार्श्वभूमी आणि टोळीची माहिती घेऊन ही कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?