Eye Disease: तुमच्या मुलांच्या हातात सतत मोबाईल असतो? मग वेळीच सावध व्हा, अन्यथा होऊ शकतो 'हा' गंभीर आजार
Eye Disease: तुमच्या मुलांच्या हातात सतत मोबाईल असेल, तर आत्ताच सावध व्हा. नाहीतर मायोपिया सारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.
Eye Disease: सध्याच्या डिजिटल दुनियेत मोबाईल हा आपल्या जिवनातील अविभाज्य घटक बनला आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. अगदी मोठ्यांपासून ते लहानग्यांपर्यंत सर्वचजण मोबाईलचा वापर करतात. गेम खेळण्यासाठी किंवा कार्टुन पाहण्यासाठी लहान मुलं मोबाईल सर्रास वापर करतात. परंतु, तुम्हाला माहितीये का? मोबाईलच्या अती वापरामुळे लहान मुलांना आरोग्याचा धोका उद्भवू शकतो. मोबाईलचा जास्त वापर लहान मुलांच्या डोळ्यांसाठी घातक ठरत असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे.
मुलांमध्ये दिसतोय मायोपिया आजार (Myopia Symptoms)
लहान मुलं स्क्रिनच्या अगदी जवळून मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे त्यांना मायोपिया सारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. डॉक्टरांच्या माहितीनुसार, मायोपिया या आजारांमध्ये, मुलांच्या डोळ्याच्या बाहुलीचा आकार वाढल्यानं प्रतिमा रेटिनापेक्षा थोडी पुढे तयार होते. त्यामुळे दुरवरील वस्तू पाहण्यास अडचण होते. अनेक संशोधनांमधून असं समोर आलं आहे की, छोटी डिजिटल स्क्रिन ही डोळ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. अशातच ज्या लहान मुलांना चष्मा आहे, त्यांचा नंबर खूप लवकर वाढतो.
मायोपियाची लक्षणं नेमकी काय?
सतत डोळ्यांची उघडझाप होणं, दुरवरचं न दिसणं, पाहण्यात किंवा अक्षर वाचतान अडचण येणं, डोकं दुखणं, डोळ्यांत पाणी येणं, पाहताना पापणीवर ताण येणं, पुस्कांमधील अक्षरं ठळक न दिसणं यासारखी लक्षणं मायोपिया या आजारात दिसून येतात.
पालकांनी काय काळजी घ्यावी?
ज्या ठिकाणी लहान मुलं अभ्यासाला बसतात, त्या ठिकाणी व्यवस्थित उजेड किंवा प्रकाश पडतोय की नाही ते पाहावं. मुलांच्या हातात मोबाईल कमी द्यावा. अभ्यासासाठी जर डिजिटल स्क्रिन लागत असेल तर मोबाईल ऐवजी लॅपटॉप द्यावा, मुलांना 'विटॅमिन A' असलेलं पौष्टिक पदार्थ द्यावेत. जर तुमच्या मुलांनासुद्धा वरील लक्षणं दिसत असतील तर आताच सावध व्हा आणि आपल्या मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )