Riteish Deshmukh : '...ते संपले, पण काँग्रेस संपली नाही'; राज्यात काँग्रेसने मुसंडी मारल्यानंतर रितेश देशमुखने ट्विट केला विलासरावांचा 'तो' व्हिडीओ
Riteish Deshmukh : राज्यात लोकसभेच्या निकाल लागल्यानंतर काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. दरम्यान त्यानंतर रितेशने दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Riteish Deshmukh : लोकसभेच्या निकालानंतर (Lok Sabha Election Result 2024) राज्यातील राजकीय गणितं पुन्हा एकदा बदलल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीच्या बाजूने महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाने विजयाचा गुलाल उधळला. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि दिवगंत नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा मुलगा रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) पोस्टने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
देशमुख घराणं हे अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत जोडलेलं आहे. विलासराव देशमुख यांच्यानंतर त्याची दोन्ही मुलं अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी देखील काँग्रेसशी भक्कम साथ दिली आहे. त्यातच आता रितेश देशमुखनेही विलासराव देशमुख यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. राज्यात 13 जागा जिंकत काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय.
रितेश देशमुखने शेअर केला विलासराव देशमुखांचा व्हिडीओ
विलासराव देशमुख यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर त्याने म्हटलं की, माझ्या वडिलांना आठवणीत श्री विलासराव देशमुख. तसेच या व्हिडिओमध्ये विलासराव देशमुखांनी म्हटलं की, लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस. इतका विस्तार आहे काँग्रेसचा. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे ते संपले पण काँग्रेस नाही संपली.हा एवढा प्रचंड इतिहास काँग्रेसला आहे, त्यागाचा, बलिदानाचा, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आहे. ही काँग्रेस अशी कुणाला संपवता संपत नाही. आजही काँग्रेस म्हणतोय, काँग्रेसचा हाथ, आम आदमी के साथ. ही काँग्रेसशी भूमिका आहे. काँग्रेसचा हात केवळ श्रीमंतासोबत नाही, तर तो सामान्य जनतेसोबत आहे, गरिबांचा हाथ या काँग्रेसने धरलाय. ही भूमिका काँग्रेसने स्वीकारली आहे. महिलांचा सन्मान करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेस कामाच्या बळावर मतं मागते, आश्वासनावर नाही. बाकीचे लोक आश्वासनावर तुमच्याकडे मत मागतात, पण काँग्रेस केलेल्या कामावर उजळ माथ्याने मत मागते. म्हणून मत मागण्याचा नैतिक अधिकार हा आमच्याकडे म्हणजेच काँग्रेसकडे आहे.
View this post on Instagram