Santosh Deshmukh Case: काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अन् तो साक्षीदार ठरणार गेमचेंजर, संतोष देशमुख प्रकरणात महत्त्वाची अपडेट
Beed crime news: संतोष देशमुख हत्याप्रकरण आता निर्णयाक टप्प्यावर आहे. स्कॉर्पिओ कारमध्ये 99 फिंगरप्रिंटस सापडल्या आहेत. हा महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटला न्यायालयात सुरु झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काही नव्या गोष्टी आणि पुरावे समोर आले आहेत. या खटल्याची सुनावणी बुधवारी झाली होती. त्यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी युक्तिवाद केला होता. आपल्या युक्तिवादात उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) हत्याप्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम आणि इतर तपशील न्यायालयासमोर मांडला होता. यावेळी त्यांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि कृष्णा आंधळे (Krishna Andhale) यांच्यातील फोन कॉलचा सीडीआर न्यायालयासमोर सादर केला होता. या खटल्यास सीडीआर हा महत्त्वाचा पुराव ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता आणखी दोन महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत.
संतोष देशमुख प्रकरणात एका साक्षीदाराचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे. हा साक्षीदार आवादा कंपनीतील ऑफिसबॉय आहे. त्याने पोलिसांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी आवादा कंपनीत येऊन गोंधळ घातला होता. यावेळी सुदर्शन घुले याच्याकडून कंपनीच्या वॉचमनलाही मारहाण करण्यात आली होती. सुदर्शन घुले कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देताना वाल्मिक कराडचे नाव घेत होता. 'आम्ही वाल्मिक कराडची माणसं आहोत', असे तो बोलत होता. यावरुन सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार आवादा कंपनीत 2 कोटींची खंडणी मागण्यासाठी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन गेले होते, या दाव्याला बळकटी मिळाली आहे.
काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत बोटांचे 99 ठसे
संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला अपहरण करुन त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली एमएच 44 झेड 9333 नंबरची स्कॉर्पिओ कार या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. फॉरेन्सिक पथकाने या स्कॉर्पिओ कारची तपासणी केली होती. तेव्हा कारमध्ये बोटांचे जवळपास 99 ठसे आढळून आले. यापैकी काही बोटांचे ठसे हे सुधीर सांगळे याच्या फिंगरप्रिंटशी जुळले आहेत. उर्वरित आरोपींच्या बोटांचे ठसेही या स्कॉर्पिओ कारमध्ये आढळून आले आहेत का, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, या काळ्या रंगाच्या कारमधून पोलिसांनी अनेक गोष्टी हस्तगत केल्याची माहिती आहे. त्यामुळे ही स्कॉर्पिओ कार संतोष देशमुख प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
























