(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pu La Deshpande : 'भाई' ते 'बटाट्याच्या चाळीचे मालक'; 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' पु.ल. देशपांडे!
Pu La Deshpande : आज पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे यांची जयंती आहे. 8 नोव्हेंबर 1919 साली मुंबईत त्यांचा जन्म झाला होता.
Pu La Deshpande Birth Anniversary : आज पु. ल. देशपांडे (Pu La Deshpande) यांची 103 वी जयंती आहे. शिक्षक, लेखक, नाटककार, अभिनेता, पटकथाकार, दिग्दर्शक, तत्त्वज्ञ, आकाशवाणी, दूरदर्शनच्या कार्यक्रमांचा निर्माता, संगीतकार, गायक, एकपात्री प्रयोगांचे जनक आणि प्रभावी वक्ता असं पु. ल. देशपांडे यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. पु. ल. सर्वांनाच प्रिय असल्याने त्यांना 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' म्हटलं जातं.
8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबईत पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे यांचा जन्म झाला. जोगेश्वरीतील सारस्वत कॉलनीत त्यांचे बालपण गेले. पार्ले टिळक विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण झाले. मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पुलंचे आकाशवाणी, दूरदर्शन, सिने-नाट्य क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे.
पुलंची गाजलेली पुस्तके -
पुलंनी वेगवेगळी पुस्तके लिहिली. त्यांचे साहित्य मराठीसह इंग्रजी आणि कन्नड भाषेतदेखील प्रकाशित झाले आहे. 'बटाट्याची चाळ', 'असा मी असा मी', 'व्यक्ती आणि वल्ली', 'खोगीरभरती', 'पुरचुंडी', 'नस्ती उठाठेव', 'गोळाबेरीज', 'हसवणूक' ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. आजही पुलप्रेमी ही पुस्तके आवडीने वाचतात. पु.ल. देशपांडे यांनी अनेक लेखसंग्रह, कथासंग्रह, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, एकपात्री प्रयोग, एकांकिका, नाटकं, विनोदी कथा लिहिल्या आहेत.
पु. ल. देशपांडे यांना मिळालेले पुरस्कार
पु.ल. देशपांडे यांनी नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले होते. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पुलंना 1990 साली भारत सरकारने कला क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. पुण्यभूषण, महाराष्ट्र गौरव, पद्मश्री, साहित्य अकादमी सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, महाराष्ट्र भूषण सन्मान, कालिदास सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी पु. ल. देशपांडे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
पुलंची टोपणनावे जाणून घ्या...
मराठी साहित्यातील एक अजरामर बहुगुणी व्यक्तिमत्त्व अर्थात पु. ल. देशपांडे म्हणजे सगळ्यांचे लाडके भाई. पु.ल. देशपांडे उर्फ भाई हजरजबाबीपणामुळेदेखील ओळखले जायचे. त्यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. धोंडो भिकाजी कडमडे जोशी, मंगेश साखरदांडे, बटाट्याच्या चाळीचे मालक, भाई, कोट्याधीश पु.ल, पुरुषराज अळूरपांडे ही पुलंची टोपणनावे आहेत.
पु. ल. देशपांडेंची लोकप्रिय नाटकं
पु. ल. देशपांडे यांनी अनेक अजरामर नाटकं लिहिली आहेत. काही इंग्रजी नाटकांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले आहे. 1948 साली त्यांनी 'तुका म्हणे आता' हे पहिलं नाटक लिहिलं. त्यावेळी हे नाटक नाट्यरसिकांच्या पसंतीस उतरलं. त्यानंतर त्यांनी 1952 साली लिहिलेलं 'अंमलदार' हे नाटक गाजलं. त्यानंतर त्यांची 'तुझे आहे तुजपाशी', 'भाग्यवान', 'सुंदर मी होणार' ही नाटकं लोकप्रिय ठरली.
महाराष्ट्राला खळखळून हसवणारे पु. ल. देशपांडे!
पुलंनी सांगितलेल्या कथा, रुजवलेली कथाकथनाची शैली यामुळे अनेक पिढ्या घडल्या आहेत. आपल्या अभिजात लेखन शैलीमुळे आणि कथा सांगण्याचा विशिष्ट पद्धतीमुळे पुलं कायमच स्मरणात आहेत. पु.ल. देशपांडे यांच्या खास लेखनशैलीमुळेच महाराष्ट्राने त्यांच्यावर अमाप प्रेम केलं आहे. नारायण, हरितात्या, पानवाला, म्हैस, पाळीव प्राणी, रावसाहेब अशा त्यांच्या अनेक कथा आजही अनेकांना तोंडपाठ आहेत.
संंबंधित बातम्या