Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली.

Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : सोमवारी (दि. 10) राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानभवनाच्या गॅलरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भेट झाली होती. तर त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची भेट टाळली. या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आता ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे. पुणे आणि मुंबईच्या पर्यावरणीय समस्यांसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणाच्या समस्या वाढल्या आहेत. मुंबईतील वायु प्रदूषण, हवेची गुणवत्ता तसेच पुण्यामधील नद्यांचा प्रश्न या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याचे माहिती मिळत आहे.
आजी-माजी पर्यावरण मंत्र्यांची भेट
तसेच मुंबईतील पीओपी संदर्भातील मुद्दा देखील महत्त्वाचा असून गणेशोत्सवाच्या तोंडावर पीओपीचा मुद्दा सध्या मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. त्या संदर्भात देखील दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीच्या काळात पर्यावरण मंत्री राहिले आहेत. त्यामुळे पीओपीच्या मुद्द्यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून आदित्य ठाकरे यावर काही तोडगा काढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर आजी-माजी पर्यावरण मंत्र्यांच्या या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीत काही राजकीय चर्चा होणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पीओपीबाबत तज्ज्ञांचा अहवाल केंद्राला पाठविणार : पंकजा मुंडे
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीओपीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. गेल्या महिन्यात राज्यातील गणेशमूर्तिकारांनी पेण येथे एकत्र येऊन पीओपी बंदीविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रस्ताव पेणचे आमदार रवींद्र पाटील यांनी मांडला होता. त्यानुसार मंत्रालयात पंकजा मुंडे यांच्या दालनात पेणमधील गणेशमूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. यानंतर 'पीओपी'बाबत तज्ज्ञांचा शास्त्रीय अहवाल केंद्र सरकारला पाठविणार असल्याचे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले आहे.
आणखी वाचा
























