IFFI : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
International Film Festival of India : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
International Film Festival of India : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी (International Film Festival of India) यंदा महाराष्ट्र सरकारकडून तीन मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
महाराष्ट्र सरकारकडून 'या' तीन चित्रपटांची निवड
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून 'ग्लोबल आडगाव' (Global Aadgaon), 'गिरकी' (Girki) आणि 'बटरफ्लाय' (Butterfly) या तीन मराठी चित्रपटांची निवड केली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'फिल्म बाजार ' या गटात दरवर्षी मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय हे तीन चित्रपट निवडण्यात आले आहेत. या तीनही चित्रपटाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी शासनातर्फे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागासाठी सहभागी होण्याकरता चित्रपटांसोबत पाठविण्यात येणार आहे.
शासनाने महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जाहिरातीद्वारे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म बाजार' या विभागात राज्य सरकारकडून पाठविण्याकरता इच्छुक चित्रपटांचे प्रवेश मागविले होते. त्यानुसार एकूण 29 चित्रपटांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. श्रीमती किशोरी शहाणे , श्री प्रसाद नामजोशी, श्री हर्षित अभिराज, श्री. समीर आठल्ये आणि श्री संदीप पाटील यांच्या समितीने परीक्षणाअंती त्यापैकी 'ग्लोबल आडगाव', 'गिरकी' आणि 'बटरफ्लाय' या तीन चित्रपटांची निवड केली.
गेल्यावर्षी संदीप पाठकच्या 'राख'चा होता बोलबाला
53 व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्यावर्षी फिल्म मार्केटसाठी 'राख' या मराठी सिनेमाची निवड झाली होती. 'राख' हा एक मूकपट आहे. त्यामुळे या प्रयोगाचे सिनेसृष्टीत कौतुक झाले होते. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा राजेश चव्हाणने सांभाळली होती. दीप पाठक आणि अश्विनी गिरी 'राख' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India) हा आशियातील सर्वात जुना तसेच भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. यंदाच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. अद्याप यंदाचा महोत्सव कधी सुरू होणार हे समोर आलेलं नाही.
संंबंधित बातम्या