देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
धनंजय देशमुख यांची एसआयटी तपासाबाबतची माहिती देत नाही, यासंदर्भातील कुटुंबीयांची मागणी आम्ही एसआयटीच्या प्रमुखांपर्यंत पोहोचवली आहे.
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडवर (Walmik karad) 302 चा गुन्हा दाखल करावा, तसेच मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. तसेच, सीआयडी पोलिसांकडून तपासाबाबत आम्हाला माहिती दिली जात नाही, योग्य दिशेने तपास सुरू आहे का, हेही आम्हाला समजत नाही. माझ्या भावाप्रमाणेच माझ्याही जिवाला धोक आहे, मग मीच स्वत:ला संपवून घेतो, असे म्हणत धनंजय देशमुख यांनी मस्साजोग गावातील टाकीवर चढून आज आंदोलन केले. अखेर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विनंतीनंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त मस्साजोग गावात पाहायला मिळाला. तर, बीडचे (Beed) पोलीस अधीक्षक नवनीत कावत हेही गावात आले होते. पत्रकारांनी त्यांच्यासोबत संवाद साधला असता खंडणीतील आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करण्याबाबत थेट उत्तर देणं त्यांनी टाळलं.
धनंजय देशमुख यांची एसआयटी तपासाबाबतची माहिती देत नाही, यासंदर्भातील कुटुंबीयांची मागणी आम्ही एसआयटीच्या प्रमुखांपर्यंत पोहोचवली आहे. SIT वरिष्ठ अधिकारी उद्या इकडे येत असून त्यांची भेट घेतील. सध्या मस्साजोग मधील परिस्थिती नियंत्रणात आहे. आमची गावकरी आणि देशमुख कुटुंबाला विनंती आहे, अशा पद्धतीने आंदोलन करू नका, आपल्या न्यायासाठी सर्व तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत, असे बीडचे एसपी नवनीत कावत यांनी म्हटलं आहे.
वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल का, असा प्रश्नही एसपी कॉवत यांना विचारला होता. संतोष देशमुख यांच्या पत्नीने सीआयडीकडे जबाब दिला असून जबाबात वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं आहे, त्यांच्याकडून धमकी देण्यात येत होती, असेही त्यांनी म्हटल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी बीडच्या नवीन एसपींना प्रश्न विचारला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे आहे, त्यामुळे मी याबाबत उत्तर देऊ शकत नाही. मी तपासाबाबत काहीही सांगू शकत नाहीत, उद्या सीआयडीचे प्रमुख येथे येणार आहेत, असे स्पष्ट शब्दात उत्तर नवनीत कावत यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुख यांनी टाकीवरून खाली उतरत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पोलिसांकडून तपासासंदर्भात कोणतीच माहिती दिली जात नसल्याचा आरोप केला. त्यावेळी बोलताना देशमुख यांच्यासह गावकऱ्यांनी राज्य सरकारला उद्या (14 जानेवारी) सकाळी 10 वाजेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. कृष्णा आंधळे आरोपी अद्यापही मोकाटच आहे. आंधळेला तत्काळ अटक करावी. तसेच वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्याला संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात सहआरोपी करुन मोक्का लावावा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
हेही वाचा
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय