Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
Nashik Dwarka Flyover Accident : नाशिक शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर रविवारी भीषण अपघाताची घटना घडली. यात पाच जण जागीच ठार तर 13 जण गंभीर जखमी आहेत.
Nashik Accident : नाशिक शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Mahamarg) रविवारी भीषण अपघाताची घटना घडली. मुंबई आग्रा महामार्गावरून धुळ्यावरून मुंबईच्या दिशेने लोखंडी साळ्या घेऊन जाणारा आयशर ट्रक जात होता. द्वारका येथे हा सळ्या असलेला ट्रक उभा होता. या आयशर ट्रकवर निफाडवरून (Niphad) देवदर्शन करून घरी जात असलेल्या तरुणांच्या टेम्पोने जोरदार धडक दिली. त्यानंतर मागून आलेल्या एका गाडीने टेम्पोला धडक दिली. या भीषण अपघातात तरुणांच्या शरीरात लोखंडी सळ्या आरपार घुसल्या. यात बापलेकासह इतर तीन जण जागेवर मृत्युमुखी पडले आहेत. तर एकूण 13 जण जखमी आहेत.
रात्री 8 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघाताची माहिती वाऱ्यासारखी नाशिक शहरात पसरली. मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस या अपघात स्थळावर पोहोचले. अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी बचावकार्य सुरू झाले. अपघाताने या संपूर्ण उड्डाणपूलावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिका अपघातस्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र तात्काळ पोलिसांनी अग्निशमन दलाला देखील पाचारण केले. जवळपास एक तास अपघाताला उलटून गेल्यानंतर सर्व अपघातग्रस्तांना शहरातील जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आले. रुग्णालयात अपघातग्रस्तांवर उपचार सुरू झाले. यावेळी जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी देखील मोठी गर्दी केली होती. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पाच जण अपघातात मृत्युमुखी पडल्याचे सांगितले.
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला
तर दैव बलवत्तर म्हणून अपघात गाडीतून अवघ्या दहा मिनिटं आधी एका तरुणाने आपल्या मित्रांसोबत जाण्यासाठी गाडीतून बाहेर पडला आणि त्याचा जीव वाचला. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी अपघाताच्या काही वेळ आधीच मुलांशी बोलणे झाले असल्याचे सांगितले. एकाने तर आपल्या आईला दहा मिनिटात घरी पोहोचत आहे, असे सांगितले होते. तर द्वारका येथे हा सळ्या असलेला ट्रक उभा होता. या आयशर ट्रकवर निफाडवरून देवदर्शन करून घरी जात असलेल्या तरुणांच्या टेम्पोने जोरदार धडक दिली. त्यानंतर मागून आलेल्या एका गाडीने टेम्पोला धडक दिली, अशी माहिती एका तरुणाच्या नातेवाईकांनी दिली आहे.
गिरीश महाजनांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी
दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना पाच लाखांची शासकीय मदत जाहीर झाली असली तरी मात्र नियम पायदळी तुडवून उघड्यावर लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकच्या चालकावर आणि संबंधितांवर काय कारवाई होते? हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेनंतर पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अपघातात बापलेकासह तीन तरुणांचा मृत्यू झालाय. त्यांची ही भरपाई नेमकी शासकीय पाच लाखांत भरून निघेल का? आणि रस्त्यावर अपघातांना कारण ठरणाऱ्या या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर काय ठोस कारवाई केली जाणार का? की असेच अनेकांचे जीव ह्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमुळे होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा