Mumbai: मुंबईकरांना अनुभवता येणार सुमधुर संगीत मैफिल; मुंबई संस्कृती संगीत महोत्सवात दिग्गज गायक आणि वादक प्रेक्षकांना करणार मंत्रमुग्ध
इंडियन हेरिटेज सोसायटी (आयएचएस) तर्फे आणि महाराष्ट्र पर्यटन यांच्या सहकार्याने 31 व्या मुंबई संस्कृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Mumbai: शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी सुमधुर संगीत मैफिल मुंबईकरांना (Mumbai) अनुभवायला मिळणार आहे. तमाम रसिकप्रेमींसाठी 14 आणि 15 जानेवारी 2023 रोजी, इंडियन हेरिटेज सोसायटी (आयएचएस) तर्फे आणि महाराष्ट्र पर्यटन यांच्या सहकार्याने 31 व्या मुंबई संस्कृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातून लाईव्ह म्युजिकच्या माध्यमातून मुंबईचा महान वारसा जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे ऐतिहासिक कॉन्व्होकेशन हॉल, मुंबई विद्यापीठ येथे या महोत्सवाचे वर्च्युअली आयोजन केले गेले होते. यंदा संस्कृतीचा हा सोहळा पूर्वीसारखाच अगदी दिमाखात ऐतिहासिक टाऊन हॉल येथे साजरा होत आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी राहुल शर्मा (संतूर) सोबत पं. भवानी शंकर (पखवाज) आणि पं. मुकुंदराज देव (तबला) हे आपल्या स्वर्गीय सुरांच्या साथीने राहुल शर्मा यांचे वडील गुरु पद्मविभूषण स्वर्गीय पंडित शिवकुमार शर्मा यांना मानवंदना देतील. गुरु पद्मविभूषण स्वर्गीय पंडित शिवकुमार शर्मा यांच्या गायनाने इंडियन हेरीटेज सोसायटीचे अनेक कार्यक्रम अविस्मरणीय ठरले होते, अशा महान व्यक्तीला स्वरमयी आदरांजली या महोत्सवात दिली जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी विदुषी शुभा मुदगल (गायन) सोबत प.अनिश प्रधान(तबला) व पं.सुधीर नायक (हर्मोनियम) आपल्या स्वरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करतील.
संगीत जगताच्या संस्कृती आणि परंपरांच्या वारसाचे संवर्धन करण्यासाठी 1992 पासून इंडियन हेरिटेज सोसायटी या आगळ्या वेगळ्या अद्भुत सोहळ्याचे आयोजन करत आहे. पूर्वी संगीताची ही मैफिल वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाकाठी रंगायची. मात्र ध्वनी प्रदुषणाच्या कारणास्तव उच्च न्यायालयाच्या आदेशाने या सोहळ्याचे ठिकाण बदलून एशियाटिक लायब्ररी येथे हलवण्यात आले. सोबतच सोहळ्याचे ‘बाणगंगा फेस्टीव्हल’हे नाव बदलून ‘मुंबई संस्कृती’असे ठेवण्यात आले.
या महोत्सवाबद्दल सांगताना इंडियन हेरिटेज सोसायटी- मुंबईच्या माजी अध्यक्षा, अनिता गरवारे म्हणाल्या, 'आपल्याकडे फार कमी गोष्टी पिढ्यानपिढ्या पुढे आल्या आहेत आणि संस्कृती त्यापैकीच एक आहे. आपला वारसा, संस्कृती, परंपरा या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांचे संवर्धन हे झालेच पाहिजे. या संवर्धनात आपलेही योगदान असावे यासाठी आम्ही हा महोत्सव आयोजित करतो,जेणेकरून कला,स्थापत्य आणि संगीताच्या माध्यमातून आपण मुंबईचा वारसा जपू शकतो आणि साजरा देखील करू शकतो. आपले दोन प्रायोजक एचएसबीसी आणि टीसीएस यांचे आम्ही सदैव आभारी आहोत कारण सुरवातीपासूनच ते या महोत्सवाच्या आयोजनासाठी आम्हाला सहकार्य करत आहेत.'
महोत्सवात आपली कला सादर करण्यासाठी उत्सुक असणारे संतूर वादक राहुल शर्मा म्हणाले की, “संगीत हे एकमेव असे माध्यम आहे जे आत्मा आणि हृदयापर्यंत पोहोचते आणि सर्व सीमा ओलांडते. यात एक भावनिक साद असते. हया महोत्सवामध्ये इंडियन हेरीटेज सोसायटीच्या अनोख्या ध्येयासाठी, ते सुद्धा प्रसिद्ध टाऊन हॉल येथे मला माझी कला सादर करायला मिळत आहे याचा मला आनंद आहे. हे सादरीकरण माझ्यासाठी खूप खास असेल कारण इंडियन हेरीटेज सोसायटी याद्वारे माझे वडील गुरु पद्म विभूषण स्वर्गीय पंडित शिवकुमार शर्मा यांना मानवंदना देणार आहे. ही मैफिल प्रेक्षकांच्या केवळ कानांपर्यंत पोहोचणार नाही तर त्यांच्या हृदयाला देखील नक्की स्पर्श करेल.
ख्यातनाम भारतीय शास्त्रीय संगीत गायिका आणि संगीतकार शुभा मुदगल म्हणाल्या की, “इंडियन हेरीटेज सोसायटीचे मुंबई संस्कृती सारखे महोत्सव लोकांमध्ये त्यांची संस्कृती आणि वारसाबद्दल प्रबोधन करतात. इंडियन हेरीटेज सोसायटी जो प्रयत्न करत आहे तो खरंच कौतुकास्पद आहे, आणि मी यंदाच्या महोत्सवाचा एक भाग आहे याचा मला अत्यानंद होतो आहे. मी मनापासून आशा करते आहे की या माध्यमातून लोकांना प्रेरणा मिळेल आणि ते त्यांच्या ऐतिहासिक संस्कृती बद्दल जागरूक होतील आणि हा वारसा पुढील पिढ्यांना सोपवतील.”
या महोत्सवाला एचएसबीसी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस यांचे संयुक्त सहकार्य लाभले असून नॉर्थन लाईटस या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करीत आहे. ज्यांना संगीताची आवड आहे, ज्यांना सांस्कृतिक वारसाचे महत्व माहित आहे. त्याच्या संवर्धनासाठी झटण्याची ज्यांची तयारी आहे अशा सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. एमटीडीसी काउंटर दादर (पूर्व), हॉटेल प्रीतम जवळ व गेट वे ऑफ इंडिया, चेतना बुक सेंटर, दादर माटुंगा कल्चरल सेंटर, आणि इंडियन हेरीटेज सोसायटी, मुंबई या ठिकाणी मोफत पासेस उपलब्ध होतील.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
