सुरक्षारक्षक तैनात, सीसीटीव्हीही ॲक्टिव्ह, तरीही ICICI होम फायनान्सवर दरोडा कसा पडला? जाणून घ्या A टू Z स्टोरी
Nashik Crime News : नाशिकच्या जूना गंगापूर नाका परिसरात असलेल्या आयसीआयसीआय होम फायनान्स या नामांकित संस्थेत धाडसी दरोडा टाकण्यात आला. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Nashik Crime News : नाशिकच्या जूना गंगापूर नाका (Gangapur Naka) परिसरात असलेल्या आयसीआयसीआय होम फायनान्स (ICICI Home Finance) या नामांकित संस्थेत धाडसी दरोडा टाकण्यात आला असून बँकेच्या एका सेफ्टी लॉकर मधून 222 खातेदारांचे तब्बल 4 कोटी 92 लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता शहरातील डोंगरे वस्तीगृह मैदान परिसरात आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये दरोडा टाकण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरांचा कसोशीने शोध घेत आहे. या दरोड्याचा उलगडा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
पीपीई किट परिधान करत संस्थेत प्रवेश
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास आयसीआयसीआय होम फायनान्सच्या पुढच्या दरवाजावर सुरक्षारक्षक तैनात होता, सीसीटीव्ही कॅमेरेही कार्यरत होते. मात्र दोन चोरांनी धाडस करत पीपीई किट परिधान केले. त्यानंतर मागील बाजूस मॅनेजरच्या खिडकीतून आता प्रवेश केला.
पंधरा मिनिटात दागिन्यांची चोरी
कार्यालयातूनच सेफ्टी लॉकरच्या चाव्या घेतल्या आणि अवघ्या पंधरा मिनिटात दागिने चोरी करत पळ काढला. शनिवारी मॅनेजरच्या हा सर्व प्रकार लक्षात येताच त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. दरम्यान, पुढच्या दरवाजावर सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र चोरांनी मागच्या खिडकीतून चोरी केली. सीसीटीव्हीची नजर असताना आणि पहारेकरांचा पहारा असतानाही चोरट्यांनी चोरीचे धाडस केले, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेचा छडा कधी लागणार? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण
सध्या सरकारवाडा पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या शोधासाठी तैनात करण्यात आले आहे. या घटनेमुळे खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खातेदारांकडून संस्थेत येऊन विचारणा केली जात आहे. संस्थेकडून तुमचा भरणा करून दिला जाईल, असे आश्वासन खातेदारकांना देण्यात येत आहे.
ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही
याप्रकरणी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीने चोरीच्या सखोल तपासासाठी पोलीस तक्रार दाखल केली आहे. आयसीआयसीआय होम फायनान्स सध्या सुरू असलेल्या तपासात अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे. ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही, अशी माहिती आयसीआयसीआयच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
बीडमध्ये चंदनतस्करी... निवडणूक धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त; नगरसेवकच होता 'पुष्पा'