बीडमध्ये चंदनतस्करी... निवडणूक धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त; नगरसेवकच होता 'पुष्पा'
पोलिसांनी या टेम्पोच्या चालक वाहकाला अटक केली असून, शरद पवार गटाचे नगरसेवक बालाजी जाधव यांचे हे चंदन असल्याचे सकृत दर्शनी स्पष्ट झाले आहे.
बीड : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनचा पुष्पा (Pushpa) हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता, पुष्पा 2 चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चंदनतस्करीवर आधारीत या चित्रपटामुळे लहान-सहान चंदनचोरही स्वत:ला पुष्पाची उपमा देतात. त्यामुळे, अशा चंदनतस्करांवर कारवाई केल्यावर पोलिसांनाही तो पुष्पाच आठवतो. बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात चंदनाची चोरटी वाहतूक करणारा एक मोठा टेम्पो केज पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Police) मदतीने ताब्यात घेतला आहे. या टेम्पो मध्ये तब्बल दोन कोटी 18 लाख रुपये किंमतीचे अंदाजे सव्वा टन चंदन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी या टेम्पोच्या चालक वाहकाला अटक केली असून, शरद पवार गटाचे नगरसेवक बालाजी जाधव यांचे हे चंदन असल्याचे सकृत दर्शनी स्पष्ट झाले आहे. बालाजी जाधव हे बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे कार्यकर्ता आहेत. त्यामुळे, या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली असून सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेले चंदन व टेम्पो सध्या केज पोलिसांच्या ताब्यात असून सदर प्रकरणी वन अधिनियम व भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करुन पुढील तपास केला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे. सध्या निवडणुकांची आचारसंहिता असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील केजमध्ये पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता, चंदनतस्करी उघड झाली आहे.
हेही वाचा