(Source: ECI/ABP News/ABP Majha)
घरातील गुप्त लॉकरमधून 30 लाखांचे दागिने चोरणाऱ्या पिता-पुत्राला अटक
Mumbai Crime News : फर्निचर आणि रंगकामासाठी घरी आलेल्या कारागिरांनी गुप्त लॉकरमधून 30 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. मात्र, पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.
Mumbai Crime News : घरी फर्निचर आणि रंगकाम करणाऱ्यांवर अतिविश्वास दाखवणे एका कुटुंबाला महागात पडले असते. फर्निचर आणि रंगकाम करणाऱ्यांनी एका सहकाऱ्याच्या मदतीने एका घरातील गुप्त लॉकरमधून 30 लाखांचे दागिने लंपास केले. मात्र, पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. घरातून ३० लाखांचे दागिने चोरल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी सुतार आणि पेंटर पिता-पुत्राला अटक केली आहे. एका घराचे काम करत असताना आरोपींना घरातील एका गुप्त लॉकर बद्दल समजले. या लॉकरमधून त्यांनी दागिने चोरले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र बाफना ( वय 31) यांचे ज्वेलरीचे दुकान असून ते लालबागचे रहिवासी आहेत. त्यांच्या घरी रंगकाम व फर्निचरचे काम सुरू होते. रंगकामासाठी आलेल्या 23 वर्षीय राजू शेखला भिंतीचा काही भाग पोकळ असल्याचे जाणवले. तपासण्यासाठी, त्याने लाकडाच्या तुकड्याने ते तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ते करू शकला नाही.
त्यानंतर, त्याने त्याचे वडील ताहिर शेख, (वय 47) यांना सांगितले, परंतु, त्याचा प्रयत्न देखील अयशस्वी ठरला. त्यानंतर ताहीरने फर्निचरचे काम करणाऱ्या बजरंग शर्मा यांच्याशी संपर्क साधला. शर्मा यांनी भिंतीला छिद्र पाडून एका डब्यात सोन्याचे दागिने लपवून ठेवलेले दिसले. त्याने दागिने काढून आपापसात वाटून घेतले.
तक्रारदाराची आई राजस्थानला गेली होती तेव्हा 4 जानेवारीपासून घरात रंगरंगोटी आणि फर्निचरचे काम सुरू होते. ती परत आल्यानंतर लॉकर उघडले असता दागिन्यांची संख्या कमी असल्याचे आढळून आले. त्यानंतर बाफना यांनी काळाचौकी पोलिसांशी संपर्क साधला.
दागिने चोरल्यानंतर, कोणताही संशय येऊ नये म्हणून राजूने भिंत रंगवली, पण तो रंग लॉकरमध्ये लावला गेला नाही. अधिकाऱ्यांना लॉकर आणि त्याच्या दरवाजाचे काही नुकसान झाले असल्याचे दिसून आले. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि आरोपींना अटक केली. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिन्ही आरोपींना न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.