LIC IPO: दोन दिवसांची प्रतिक्षा, आणखी स्वस्तात LIC चे शेअर खरेदी करता येणार!
LIC Listing News : एलआयसीचा शेअर आयपीओच्या माध्यमातून मिळाला नसला तरी लिस्टिंगच्या दिवशी स्वस्तात मिळू शकतो. जाणून घ्या होईल शक्य...
LIC Listing News : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या आयपीओचे वाटप झाले आहे. अनेकांना एलआयसी आयपीओ लागला नाही. तुम्हाला एलआयसीचे शेअर खरेदी करण्याची इच्छा असेल तर आणखी दोन दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. दोन दिवसानंतर एलआयसीचा शेअर आणखी स्वस्तात खरेदी करू शकतात.
17 मे रोजी होणार लिस्टींग
दोन दिवसानंतर, 17 मे रोजी एलआयसी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. 17 मे पासून शेअर बाजारात ट्रेडिंग सुरू होणार आहे. त्यानंतर तुम्हाला एलआयसीचे शेअर खरेदी आणि विक्री करता येणार आहे.
स्वस्तात मिळणार एलआयसीचे शेअर?
एलआयसीचे शेअर स्वस्तात कसे खरेदी करता येतील असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. एलआयसीने आपल्या शेअरचा इश्यू प्राइज 949 रुपये प्रति शेअर इतका निश्चित केला आहे. ज्यांनी किरकोळ गुंतवणुकदारांच्या कोट्यातून एलआयसीच्या आयपीओसाठी बोली लावली आणि ज्यांना लॉट मिळाला त्यांना प्रति शेअर 949 रुपये मोजावे लागले आहेत.
ग्रे बाजारात एलआयसीचा शेअर प्राइस अजूनही आपल्या इश्यू प्राइजच्या खाली आहे. आघाडीच्या शेअर ब्रोकरेज फर्मनुसार, एलआयसी आयपीओचा ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम दर (LIC Grey Market Premium)शून्य ते 18 रुपये आहे. म्हणजेच ग्रे मार्केटच्या अंदाजानुसार, एलआयसीची लिस्टींग 18 रुपये सवलतीच्या दरात होऊ शकते.
ग्रे मार्केटच्या अंदाजानुसार, एलआयसीचा शेअर लिस्टींगच्या वेळेस 949 रुपयांऐवजी 931 रुपयांवर होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला एलआयसीचा शेअर स्वस्त दरात खरेदी करू शकता.
एलआयसी IPO ला चांगला प्रतिसाद
एलआयसी आयपीओला गुंतवणुकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक सब्सक्रिप्शन पॉलिसीधारकांसाठी राखीव असलेल्या कोट्यात झाले. पॉलिसीधारकांसाठीच्या कोट्यात 6.12 पटीने सब्सक्रिप्शन झाले होते. त्याच वेळेस एलआयसीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यात 4.4 पटीने सब्सक्रिप्शन झाले होते.
(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीम पूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा, गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)