BLOG | कोरोना काळातील संयमी भक्ती
देवाचा दरबार उघडला म्हणजे भाविकांची गर्दी होणार नाही असे म्हणणे चुकीचे असले तरी या काळात खबरदारी घ्यावीच लागेल, अन्यथा भविष्यात त्याचे धोके सर्वांनाच सहन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेवटी योग्य वेळ साधून महाराष्ट्र शासनाने उद्यापासून प्रार्थनस्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. गेले अनेक दिवस विविध स्तरांतून प्रार्थनासथळे उघडावीत म्हणून जोरदार मागणी होत होती. काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आली. मात्र, शासनाने कोरोनाचे गहिरे संकट पाहता योग्य वेळ आल्यावर निश्चित प्रार्थनासथळे उघडू ह्या भूमिकेवर कायम राहिले. आजच्या घडीला राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे, त्या अनुषंगाने शासनाने ह्या धार्मिक स्थळांवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक भाविक मंदिराकडे रवाना होतील, देवाचे दर्शन घेतील.
मनातील खूप दिवस दाबून ठेवलेल्या गोष्टी देवासमोर सांगतील. सगळं काही पूर्वीसारखे आलबेल व्हावे म्हणून प्रार्थना करतील. मात्र, सर्वच नागरिकांनी एक गोष्ट विसरता कामा नये ती म्हणजे कोरोना बाधितांची फक्त संख्या कमी झाली आहे, कोरोना समूळ नष्ट झालेला नाही. धोका आजही कायम आहे. आजही राज्यात हजारोंच्या संख्येने नवीन रुग्ण सापडत आहे. या अशा कोरोनामय काळातील नागरिकांनी देवाची भक्ती करताना सुरक्षिततेचे भान ठेवावे. देवाचा दरबार उघडला म्हणजे भाविकांची गर्दी होणार नाही असे म्हणणे चुकीचे असले तरी या काळात खबरदारी घ्यावीच लागेल, अन्यथा भविष्यात त्याचे धोके सर्वांनाच सहन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट पासून ते दुसरी लाट येण्याची शक्यता आणि त्यासाठी लागणारी पूर्वतयारी या दोन गोष्टीवर सध्या आरोग्य व्यवस्था काम करत आहे. या सर्वांतून एक अर्थ अभिप्रेत असा आहे की या काळात लोकांनी काळजी घ्यावी असे वैद्यकीय तज्ञांनी ठणकावून सांगितले आहे. राज्य शासनाने दिवाळी सुरु होण्यापूर्वी हा सण साधेपणा साजरा करा असे आवाहन केले होते, काही प्रमाणात त्याला यश आलेही. मात्र सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, असे वारंवार सांगूनही लोकांनी मात्र रस्त्यांवर आणि बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचे चित्र संपूर्ण राज्यभर होते. या संदर्भातील विडिओ आणि छायाचित्र मोठ्या प्रमाणात वायरलही झाले होते.
कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतर अनेकवेळा सांगण्यात आले होते कि गर्दी करून नका, कारण बाधित व्यक्तीकडून या आजाराच्या संसर्गाची लागण मोठ्या प्रमाणात होऊ शकते. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण यामुळे निर्माण होऊ शकतात. अनेकवेळा धोक्याच्या सूचना देऊन ससुद्धा जर त्या पाळल्या जात नसतील तर ह्या मुळे आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात समस्या येत्या काळात भेडसावू शकतात. मागच्या कोरोना काळातील घटनांतून बोध घेणे अपेक्षित असताना नागरिक का असे वागत असतील असा प्रश्न सध्याची गर्दी पाहिल्यावर पडतो. महाराष्ट्रात आता पर्यंत 17 लाख 44 हजार 698 रुग्ण या आजाराने बाधित झाले असून त्यापैकी 16 लाख 12 हजार 314 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 45 हजार 914 रुग्ण या आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. सध्याच्या घडीला 85 हजार 503 रुग्ण राज्यातील विविध भागात आजही उपचार घेत आहेत.
प्रार्थनास्थळे उघडलीत म्हणजे कोरोनाचा संसर्ग संपला असा अर्थ होत नाही. अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने सर्वच गोष्टी उघडण्यात येणार आहे हे राज्य सरकारने आधीच जाहीर केले होते, फक्त ते योग्य वेळेची वाट पाहत होते. आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात निर्णय घेताना शास्त्रीय आधार घेऊन वैद्यकीय तज्ञांच्या मतांचा अभ्यास करून निर्णय घ्यावे लागतात. येथे भावनिक होऊन निणर्य घ्यायचे नसतात तर नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीचा प्रथम विचार करावा लागतो आणि सर्वागीण बाजूने विचार केल्यानंतर असे विविध निर्णय शासन घेत असते. त्याचा सर्वच नागरिकांनी आदर करणे अपेक्षित आहे.
शनिवारी, पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव-देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच. या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रम आखण्याची आता गरज आहे. हा कार्यक्रम केवळ नागरिकच आखू शकतात. शासन सूचना देऊ शकतात परंतु त्याचे पालन करण्याची जबादारी ही नागरिकांच्याच हातात आहे. कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा हा आजार फारसा कुणाला माहित नव्हता. मात्र या पायबंद कसा घालता येईल याची माहिती राज्यातील डॉक्टरांना चांगलीच कळाली आहे. आपल्या डॉक्टरांनी या आजारांशी लढण्यासाठी चांगली उपचारपद्धती विकसित केली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जाण्यात आरोग्यव्यवस्थेला चांगले यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे हा आजार फैलावू नये यासाठी आता नागरिकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने जे उपाय सुचविले आहेत त्याचे व्यवस्थित पालन केले पाहिजे. कोरोनाची लाट दुसरी येईल, ती लाट किती मोठी असेल याबाबत विविध मतांतरे असली तरी सावधगिरीचा उपाय म्हणून राज्यातील आरोग्य व्यवस्था सज्ज राहणार आहे. दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन पूर्वतयारी करून ठेवण्यात आली आहे. आता ती लाट येऊच नये आणि आली तरी सौम्य प्रमाणात असावी यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे आतपर्यंत ज्या पद्धतीने सर्व सणवार सध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहे त्याचपद्धतीने देवळात प्रवेश करताना या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवल्या तर सर्वांचे आयुष्य आरोग्यदायी राहण्यास मदत होईल.
कोरोनाविरोधातील लस निर्माण होईपर्यंत या आजारांपासून प्रत्येकाने कसे वाचता येईल हाच प्रयत्न सातत्याने ठेवला पाहिजे. गेल्या काही दिवसात रस्त्यांवर निर्माण झालेली गर्दी आणि उद्यापासून धार्मिक स्थळं खुली झाल्याने तेथेही गर्दी येथेही होऊ शकते. या गर्दीच्या वातावरणात कोरोनाचा संसर्ग कुणाला होऊ नये ही एकच चिंता प्रशासनाला आणि वैद्यकीय तंज्ञाना सतावत आहे. कारण कोरोनाच्या आजाराचे स्वरुप सगळ्यानांच परिचित आहे. एखादा बाधित व्यक्ती सगळ्यांना या आजराचा 'प्रसाद' वाटू शकतो त्यामुळे खबरदारी घेणे हे एकमेव नागरिकांच्या हातात आहे. त्यामुळे अशा काळात मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालन हे करावेच लागेल. विनाकारण एकाचवेळी मंदिरात गर्दी टाळण्याची जबाबरी ही नागरिकांची आहे, असे झाल्यास भविष्यात येणाऱ्या अनेक लाटांविरुद्ध राज्यातील नागरिक सहजपणे दोन हात करतील यात शंका नाही.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!
- BLOG | अरे, राज्यात कोरोना आहे!