BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
आजाराचा संसर्ग वाढत जाणे आणि बाधित रुग्ण बरे होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे आधी आपण लक्षात घेतले पाहिजे. बाधित रुग्ण बरे होत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र त्याचवेळी संसर्गाचा फैलाव होऊन नवीन रुग्णाचे निदान, तेही बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा दुपटीने होणे ही चिंताजनक बाब आहे.
>> संतोष आंधळे
गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. यामध्ये कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. कोरोनाबाधितांचे आकडे कुठल्याही पद्धतीने सांगितले तरी ते बदलत नाही. विश्लेषण करून सांगितले तरी बदलत नाही. आपण ढोबळमानाने गृहीत धरू, एकूण रुग्ण संख्येमधून, रुग्ण बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या वजा करून आता फक्त जे रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, त्यांची संख्या फक्त रुग्णसंख्या म्हणून गृहीत धरायची. मग रुग्णसंख्येयचा आकडा लहान होईल. या सगळ्या प्रकारातून कोरोना सारख्या महाभयंकर आजराबाबतची नागरिकांमधील भीती कमी होईलही. पण आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार करता लागण झालेले एकूण, त्यातून बरे झालेले तसेच मृतही आकडेवारी प्रकाशित करण्याची एकच पद्धत जगभरात सर्वमान्य आहे. रोज कोरोनाबाधितांचे जे आकडे वाढत आहेत, ते कमी करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायची गरज आहे, ही भूमिका घेऊन जर आपण पुढे गेलो तर कोरोनाला पायबंद करण्यात निश्चित यश संपादन होईल. साथीच्या रोगात जनऔषध वैदकशास्त्रात, विविध मानकांचा वापर करून हा आजार कशापद्धतीने पुढे जाईल याचं अनुमान काढले जाते. त्याचप्रमाणे आजाराची एकूण रुग्ण संख्या ही शास्त्राचा आधार घेऊन त्याची वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी होऊ शकते.
आजाराचा संसर्ग वाढत जाणे आणि बाधित रुग्ण बरे होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे आधी आपण लक्षात घेतले पाहिजे. बाधित रुग्ण बरे होत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र त्याचवेळी संसर्गाचा फैलाव होऊन नवीन रुग्णाचे निदान, तेही बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा दुपटीने होणे ही चिंताजनक बाब आहे, हेही आपण येथे ध्यानात घेतले पाहिजे. राज्याचा आरोग्य विभाग दररोज मेडिकल बुलेटिन जारी करत असतो. त्यानुसार रविवारी जी आकडेवारी जाहीर केली होती, त्याप्रमाणे 1632 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे आणि 3390 नवीन रुग्णांनाच निदान झाल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून नवीन रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. तसेच 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असेही या बुलेटिनमध्ये सांगण्यात आले आहे. दिवसागणिक या आजाराने होणाऱ्या मृत्यूंची संख्याही बऱ्यापैकी आहे.
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची बरे होण्याची संख्या सध्याच्या घडीला रुग्ण म्हणून असणाऱ्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे. देशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या 1 लाख 53 हजार 106 रुग्ण आहेत आणि 1 लाख 69 हजार 797 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मोठ्या संख्येने रुग्ण घरी गेले आहेत, ही गोष्ट चांगली आहे. याचा अर्थ आपल्या डॉक्टरांचे रुग्णावरील उपचार योग्य पद्धतीने सुरु आहेत, रुग्ण औषधांना प्रतिसाद देत आहेत. मात्र यामुळे या आजाराचा संसर्ग कमी झाला असा होत नाही. दररोज नवीन लागण होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण ज्यावेळी कमी व्हायला लागेल त्यावेळी खऱ्या अर्थाने हा आजाराला आपण पायबंद घालण्यास सुरुवात झाली, असं म्हणता येईल.
साथीच्या आजारात सुरवातीला म्हटल्याप्रमाणे, रुग्णसंख्या, त्याच्या वाढीचं प्रमाण अनेक विश्लेक्षणात्मक गोष्टीची मांडणी करण्यात येते. गेल्या काही दिवसात लोकांच्या कानावर सातत्याने काही शब्द पडत आहेत. त्यापैकी डब्लिंग रेट, म्हणजेच दर किती दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. याचा दर, रुग्णांच्या वाढीची संख्या जितक्या दिवसाने दुप्पट होते त्याला डब्लिंग रेट असे म्हणतात. हा रेट वाढण्याकरिता जितके जास्त दिवस होतील, तेवढं ते चांगले मानले जाते. आर नॉट नंबर (बेसिक रिप्रॉडक्शन नंबर) म्हणजे प्रसारांक, कोरोनाबाधित रुग्णापासून किती लोकांना हा आजार होऊ शकतो, तो आकडा म्हणजे आर नॉट नंबर. रिकव्हरी रेट कोरोनामुक्त होण्याचा म्हणजे रुग्णसंख्या बरा होण्याचं दर. हा दर जितका जास्त तितकं ते रुग्णाच्या आरोग्याच्या फायद्याचे असते. डेथ रेट, म्हणजे मृत्यूदर संपूर्ण रुग्णाच्या संख्येच्या तुलनेत हा दर कमी असणे किंवा तो शून्यावर आणणे हे आरोग्य विभागाचे लक्ष्य आहे. ग्रोथ रेट म्हणजे रुग्ण संख्या वाढीचा दर, हा दर कमी असणे अपेक्षित आहे.
आरोग्य यंत्रणेबरोबर प्रशासन रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावेत म्हणून नवनवीन योजना आखत आहे. त्यानुसार बहुतांश नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी करावी लागणारी धावपळ आणि त्यात खासगी रुग्णालयाचे महागडे उपचार या दोन समस्यांचं निराकारण करण्याकरिता रामबाण उपाय म्हणून, मुंबईतील खासगी रुग्णालयाच्या शुल्कावर चाप त्याबरोबर या रुग्णालयातील 80 टक्के खाटा सरकारने ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयात कोरोनाबाधितांवर मोफत उपचार देण्याचे याअगोदरच जाहीर केले आहे. मात्र यांची अंमलबाजवणी व्यवस्थित होत नसल्याने यावर देखरेख करण्याकरिता पाच सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. या सगळ्या निर्णयाची अंमलबाजवणी व्यवस्थित झाली तर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.आपण हे मान्य केले पाहिजे, आपल्याला रोगाशी लढायचं आहे, आकडेवारीशी नाही. साथीच्या आजारात आकडे वाढणारच, कारण हा आजारच तसा आहे. संसर्गजन्य आजारात रुग्णांची संख्या टप्याटप्याने वाढते हे आपण सगळ्यांनी जगात बघितले आहे. मात्र या आजाराला आपण पायबंद कसा घालू शकतो, त्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नागरिकांनीही हा आजार होऊ नये त्याकरिता आरोग्य विभागाने आणि प्रशासनाने जे सुरक्षिततेच्या दृष्टीने जे नियम आखून दिले आहे त्यांचे पालन केले पाहिजे. वैद्यकीय तज्ञांना या आजाराच्या वर्तनाची संपूर्ण माहिती आहे आणि ते त्यापद्धतीने त्याचा सामना करत आहे. आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक जण त्यांचं काम इमाने इतबारे करत आहेत. डॉक्टर आणि त्यांचे सहकारी जीवाची बाजी लावून रुग्णांना योग्य ते उपचार देत आहेत. त्याकरिता त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. अनेक वयस्कर, लहान, अतिगंभीर रुग्णांना डॉक्टरांनी बरे करून घरी पाठवले आहे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?