(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!
कोरोना येत्या काळात कसा वागेल याचा थांगपत्ता कुणालाच नाही. अर्थव्यवस्था हळू हळू पूर्वपदावर येण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे त्याचा कुणीही गैरफायदा न घेता केवळ आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, कारण कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही.
>> संतोष आंधळे
कोरोनाबाधितांची दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे, रुग्णसंख्येचा चढता आलेख उतरणीला लागला आहे. हे वास्तव असले तरी धोका मात्र अजिबात टळलेला नाही. कारण मागील काही काळातील आपण कोरोनाचे वर्तन बघितले तर लक्षात येते की ज्या ज्या ठिकाणची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या कमी झाली होती. त्या परिसरातील संख्या पुन्हा एकदा वाढीस लागली होती. त्यामुळे राज्यातील काही शहरात आणि जिल्ह्यात ही संख्या कमी होत असली तरी कधीही वाढू शकते त्यामुळे नागरिकांनी रुग्णसंख्या कमी झाली असून सगळं काही आलबेल झालं आहे ह्या भ्रमात कदापीच न राहता अधिक सजग राहणे गरजेचे आहे नाहीतर गफलत होऊ शकते. कोरोना रुग्ण बरे होत असले तरी अनेक रुग्ण असे आहेत की त्यांना घरी जाऊन त्यांना वेगळ्या काही व्याधींना सामोरे जावे लागत असून वेळ प्रसंगी रुग्णालयात पुन्हा उपचाराकरिता दाखल करावे लागत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्यापासून सुरक्षित राहायचे असल्यास सध्याच्या घडीला एक उपाय आहे तो म्हणजे सुरक्षिततेचे नियम पाळणे. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली आहे, ही दुसरी लाट आहे, की आता पिक आहे हे शास्त्रीय आधारावर अजून कुणी सांगू शकलेले नाही. प्रत्येक जण आडाखे बांधत आहे. त्यामुळे कोरोना येत्या काळात कसा वागेल याचा थांगपत्ता कुणालाच नाही. अर्थव्यवस्था हळू हळू पूर्वपदावर येण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे त्याचा कुणीही गैरफायदा न घेता केवळ आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, कारण कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही.
मंगळवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला 2 लाख 47 हजार 23 रुग्ण ऍक्टिव्ह असून विविध ठिकाणी उपचार घेत आहे. जमेची बाजू म्हणजे ज्या शहरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती, त्यापैकी पुणे, जळगाव, औरंगाबाद, धुळे, नागपूर आणि मुंबई या शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र पुणे, ठाणे आणि मुंबई शहराची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना सांगितले की " कोरोनाविरोधात लस येईपर्यंत सुरक्षित राहण्याकरिता मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि हाथ धूत राहणे हेच हेच हत्यार आहे. या संदर्भात देशभरात लवकरच जनजागृती अभियान सुरु केले जाणार आहे."सणासुदीचा काळ असल्यामुळे काही नागरिक गाठी भेटी घेण्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. सध्या ते टाळणे काळाची गरज आहे. मार्च महिन्यापासून सर्वच सण सगळ्यांनी साधेपणाने साजरे केले आहे. त्याचप्रमाणे पुढील काळात अशाच पद्धतीने वागणे अपेक्षित आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना या आजाराची लागण झाली आहे. ते आपले काम करीत आहे, त्यांना बळ मिळेल असे सर्वसामान्य नागरिकांचे वर्तन असले पाहिजे.
शहरातील मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे सांगतात की, "काही दिवसाच्या दैनंदिन रुग्णसंख्येच्या आकडेवारीवर न जाता अजून पुढील दोन आठवडे जर रुग्णसंख्या कमी होत राहिली तर आपण एखाद्या निष्कर्षांपर्यंत येऊ शकतो तोपर्यंत यावर लगेच याचा अर्थ काढणे योग्य ठरणार नाही. उलट बऱ्यापैकी गोष्टी राज्यात सुरु करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आपण अधिक सजग राहण्याची गरज आहे. मागील काही काळात टेस्टिंगची संख्या पाहावी लागेल. काही तज्ञ लोकांच्या चर्चेच्या दरम्यान असं जाणवतं की किमान अशीच परिस्थिती राहिली तर आपण एका विशिष्ट पायरीवर (प्लेटो) पोहचलो आहोत तिथून आपण खाली येऊ शकतो. मात्र ठोस अजुनही काही सांगता येत नाही. त्यामुळे सुरक्षित वावर सर्वच नागरिकांनी ठेवला पाहिजे असे मला वाटते. "
ऑगस्ट 7, ला 'उचांक ते नीचांक' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये रुग्णसंख्याचे उचांक येतील, अजूनही येतील मात्र आपण सगळ्यांनीच मिळवून या रुग्णसंख्येचा नीचांक कसा आणता येईल यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहे. काही नागरिकांना कोरोना गायब झाल्याचा फील येत आहे, त्यामुळे ते बिनधास्त हिंडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र या छोट्या गोष्टी भविष्यात महागात पडू शकतात. कोरोना झाला तर बरा होतो हे तेवढंच खरे असले तरी काही लोकांना तो जिकिरीस आणल्याची उदाहरणे पण आपल्याकडे आहेत. त्यामुळे सध्याच्या या कोरोनाकाळात सुरक्षितता हीच मोठी गुरुकिल्ली हे विसरून चालणार नाही. गेले अनेक महिने संपूर्ण देश या कोरोनाबाधितांची संख्या या काळात कमी कशी करता येईल या करता रात्र-दिवस झटताना दिसत आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढतच आहे. एका बाजूला लॉकडाउनमधील शिथिलता वाढवून आर्थिक व्यवहाराची घडी बसवतानाचे राज्य शासन प्रयत्न करीत असताना रुग्णवाढ होणे निश्चितच सध्याच्या घडीला आपल्याला परवडणारे नाही. कारण सध्या राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या पावसाळी आजारांना दुर्लक्षित करून चालणार नाही. अनेक वेळा हा युक्तिवाद केला जातो की टेस्टिंगचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मात्र मूळ मुद्दा तसाच राहतो, तो म्हणजे ते टेस्टिंग केल्यामुळे जो रुग्ण निर्माण झाला आहे तो रुग्णच आहे त्याला उपचाराची, विलगीकरणाची आणि अलगीकरणाची गरज आहेच. त्यामुळे या 'रुग्णसंख्या वाढीला केवळ टेस्टिंग वाढ' जबाबदार असल्याचे साधं लेबल लावण्याऐवजी ती रोखता कशी येईल यासाठीच प्रयत्न केला गेला पाहिजे.
इंडिअन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे सांगतात की. "तात्काळ या विषयवार बोलणे उचित ठरणार नाही, याकरिता अजून तीन आठवडे वाट पाहावी लागणार आह. साथीच्या आजाराच्या आलेखाचे हे तात्पुरते सपाटीकरण ? हर्ड इम्मुनिटी ? कि कमी टेस्टिंग या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतरच आपण एका निष्कर्षांपर्यंत पोहचू शकतो. तो पर्यंत सगळ्यांनीच सुरक्षिततेचे सर्व उपायांचे पालन केले पाहिजे. राज्यभरात काही सिरो सर्वे करण्यात आले आहे त्यामध्ये जे कोरोनाचे हॉटस्पॉट होते त्या ठिकाणी बऱ्यापैकी अँटीबॉडीज विकसित झाल्याचे दिसत आहेत. त्या ठिकाणाहून फार क्वचित नवीन रुग्ण तयार होण्याची शक्यता आहे. मात्र जे उच्चभ्रू वस्त्या आहेत, गृहणीना संकुल आहेत त्या ठिकाणी अजूनही लोकामंध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचे दिसून आले नाही. त्याठिकाणाहून मात्र नवीन रुग्ण निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रुग्णसंख्या कशी पद्धतीने आलेख बदलत आहे हे काही काळ पाहावे लागणार आहे."
गेल्या सहा महिन्यात आपल्याकडील डॉक्टरांचा कोरोनाच्या अनुषंगाने चांगला अभ्यास झाला आहे. जे रुग्ण तात्काळ लक्षणे दिसताच तज्ञांचा सल्ला घेत आहे, त्यांना डॉक्टरांना उपचार देण्यात यश आहे. काही दिवसाच्या उपचारानंतर रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत, हे चांगले संकेत आहेत. मात्र याकरिता रुग्णांनाही लक्षणे दिसत असतील तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे अपेक्षित आहे. रुग्णसंख्या कमी करायची आहेच पण त्यासोबतच महत्त्वाचे म्हणजे मृत्यची संख्या कमी करणे हे मुख्य लक्ष्य असले पाहिजे. उपहारगृहे आणि बार सुरु झाली आहेत, त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी नागरिकांसोबत उपहारगृहे आणि बार चालकांनी तरच कोरोनाच्या या संकटाला आळा घालण्यास मदत होणार आहे.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या