दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
कोरोनाच्या या ओढावलेल्या परिस्थितीत बाहेर पडणं शक्य नसल्याने नातेवाईक मित्रपरिवारातील कुणाचं निधन झालं असलं तरी त्यात सहभागी होता येत नाहगीए, सुखात नाही तर आता दु:खातही सहभाग घेता येत नाही इतकी वाईट परिस्थिती कोरोनाने उभी केलीय.
आपण कायम म्हणत असतो किंवा तुम्ही हे अनेकांकडून ऐकलं असेल, एखाद्या वेळेस आपण जवळच्या व्यक्तीच्या आनंद सोहळ्यला जाऊ नये पण दुःखाच्या प्रसंगी कायम हजेरी लावावी. जर एखादा मित्र किंवा कुटुंब परिवारातील निधनाची बातमी ऐकली किंवा कुणी आजारी असेल तर आपण क्षणांचाही विलंब न लावता त्या ठिकाणी सांत्वन किंवा आपल्या जवळच्या त्या व्यक्तीचं मनोबल उंचवण्यासाठी हजर राहतो. मात्र कोरोना सारख्या जाली दुश्मन ठरलेल्या या आजराने या सगळ्या नात्या-गोत्यावर पाणी फेरलंय. अगदी घरच्या व्यक्तीच्या आजरपणात किंवा दुर्दैवी निधनात सगळ्यांना दूर ठेवणारा हा आजार जगाच्या पाठीवर अनेक पिढ्यानी पहिल्यांदाच अनुभवला असेल.
आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघितलं असेल की, अनेक नागरिकांनी म्हणजे मुलाने आपल्या आईचा, पत्नीने पतीचा, अंत्यविधी मोबाईल मधील व्हिडिओ द्वारे बघून जिथे आहे त्या ठिकाणावरून श्रद्धांजली वाहिली. हे केवळ एका देशाचं चित्र नाही तर अशा घटना बऱ्याच देशात घडल्या आहेत. आजारी आई-बाबांना मुलं सध्या या महाभयंकर परिस्थितीत मोबाईलवरूनच विचारपूस करताना आढळत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण कितीही जवळचा व्यक्ती असला तरी भेटण्यावर कडक निर्बंध आहेत. संपूर्ण जगामध्ये सुद्धा सध्या हीच परिस्थिती आहे. विशेष म्हणजे ज्या पद्धतीने कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढत आहे त्यामुळे असे वाटत नाही की हा आजार इतक्यात लगेच आटोक्यात येईल. आरोग्य तज्ज्ञांच्या मते अजून हा पूर्ण महिना जाऊ शकतो त्यामुळे सगळ्यांनीच काटेकोरपणे काळजी घेतली पाहिजे.
यावर प्रतिक्रिया देताना जेष्ठ साहित्यिक रा. रं बोराडे सांगतात की, "माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मनुष्य इतका भित्रा आहे ते पाहिलं. मात्र हे ही तितकंच खरं आहे की हा आजार संसर्गजन्य आहे याचं सगळयांनी भान ठेवलं पाहिजे. शासनाने आणि पोलिसांनी जे नियम घालून दिले आहेत त्यांचा मान सगळ्यांनीच राखला पाहिजे. हे खरं आहे की आपल्या जवळचा कुणीही नातेवाईक आजारी असेल किंवा त्यांचे निधन झाले असेल तर आपण सर्व जण एरव्ही तेथे हजर राहतो. परंतु, सध्याचा काळ हा भयानक आहे. या काळात जेव्हा कुठे कुण्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर तेव्हा त्या घरचे लोकच सर्वांना कळवतात की सध्या कोरोना सारख्या परिस्थतीत कुणीही येऊ नये. शिवाय अशा परिस्थितीत प्रेत जाळावं की पुरावं हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो कारण, आपल्याकडे प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे अंत्यविधी केले जातात. मात्र या काळात डॉक्टरांच्या सांगण्यानुसार निर्णय घ्यावे लागतात कारण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता घेतलेली ही काळजी असते."
स्वकीयांच्या दुःखातही सहभागी न होऊ देणाऱ्या या आजाराला पायबंद घालायचा असेल तर नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणत अपेक्षित आहे शिवाय कडक शिस्त आणि निमयांचं पालन करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने केरळ राज्याने यशस्वी लढा देऊन या रोगावर मात करून विजय मिळविला आहे, तशाच काहीशा पद्धीत्ने आपल्यालाही वागण्याची गरज आहे. जर आपण सगळ्यांनीच मिळून सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्याचे ठरवले तर नक्कीच या जोरावर आपण विजयी मिळवू शकतो.
दोन मे च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजार 296 झाला असून 521 जणांचा मृत्यू झाला आहे, तर त्यापैकी एकट्या मुंबई परिसरात 8 हजार 359 रुग्ण असून 322 जण मृत पावले आहेत. राज्याची आरोग्य यंत्रणा या आजाराला आळा घालण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत दोन हजार रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. अशा या रोगट वातावरणात आजारी पडू नये म्हणून प्रत्येक जण स्वतःची काळजी घेत असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण अशा वेळी आजारी पडू नये अशी स्थितीच आहे.
एकंदर काय तर रुतलेलं अर्थव्यवस्थेचं चक्र हळूहळू चालू होईल, शासनाने काही ठिकाणी लॉकडाऊन मध्ये अटी शर्तीसह शिथिलता आणायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आपल्याला कोरोनासहित जीवन जगायचे हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे. ज्या विषयवार इतके दिवस चर्चा रंगात होती, तो विषय म्हणजे दारुची दुकानं उघडण्यास काय हरकत आहे, त्यामुळे राज्याला महसूल मिळणार आहे. अंतिमतः त्यावर निर्णय झालेला दिसतोय कंटेन्मेंट भाग वगळता रेड झोन मधील परिसरातील दारुची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्तवाहिनीवर येत आहे. मात्र यामुळे आधीपेक्षा नागरिकांना जास्त सजग राहावं लागणार आहे. कारण यापुढे प्रत्येक जण एकमेकाला संशयाने बघण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण लक्षणंविरहित कोरोनाबाधितांची संख्या ही फार मोठी आहे, त्यामुळे समोर येणाऱ्या व्यक्तीला भलेही कोणती लक्षणं नसतील मात्र तरी आपण नाका-तोंडावर मास्क लावून एक ठराविक अंतरावर उभे राहूनच बोललं पाहिजे.