(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारत एक रंगीबेरंगी आविष्कार! सर्वांना किमान 5 भाषा बोलता आल्या खूप छान होईल
काही दिवसांपूर्वी, मी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील एका महत्वाच्या अधिकाऱ्याबरोबर चर्चा करत होतो. मी त्यांना विचारले, "तुम्ही पाकिस्तानला इतके का डोक्यावर घेता? तो देश कसा वागतो याबद्दल सगळे माहीत असून सुद्धा तुम्ही त्यांना अधिकाधिक मदत करत असता, पण इतिहास पहाता, तुम्ही आम्हाला बराच त्रास दिला आहे."
तो अधिकारी उत्तरला, "सद्गुरू, प्रश्न आजच्या नेतृत्वाचा नाही आहे. 1947 मध्ये जेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले , तेव्हा आमचा जगात फार कोणाशी संपर्क नव्हता. जो होता तो ब्रिटिशांमार्फत होता. त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळत असे. पाकिस्तानकडे एकच धर्म आणि एकच ध्येय असल्याने पाकिस्तान यशस्वी होईल असे स्पष्ट चित्र त्यांनी आमच्यासमोर उभे केले होते. भारतात अनेक घटक आहेत, त्यामुळे भारत स्वतःलाच नष्ट करेल असे त्यांचे मत होते."
आपल्याकडच्या विविधतेत असलेल्या ताकदीला लोकांनी कमी मानले; भारत निश्चितच प्रगती पथावर आहे. हा देश कोणत्याही गोष्टींच्या समानतेतून बनलेला नाही, हेच भारताचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा लोक देश उभा करतात तेव्हा ते नेहमीच भाषा, धर्म, वंश किंवा वांशिकता यामध्ये समानता शोधतात. त्यांना वाटते की समानतेमुळे ताकद मिळते. पण आपण हा विचार धुडकावून लावला आहे. तुम्ही 50 किलोमीटर जरी इथून दूर गेलात तरी तिथले लोक वेगळे दिसतात, वेगळी भाषा बोलतात, वेगळ्या प्रकारचे कपडे घालतात आणि वेगळे अन्न खातात.
भारतामधील भाषा समृद्धी
आपल्या मज्जासंस्थेद्वारा हाताळली जाणारी सगळ्यात गुंतागुंतीची गोष्ट म्हणजे भाषा. कोणतीही भाषा पूर्णपणे विकसित व्हायला अंदाजे हजार वर्षांचा कालावधी जावा लागतो. आपल्या देशात 1300 हून जास्त उपभाषा आणि बोलीभाषा आहेत. जगात इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये किंवा समाजामध्ये आपल्या इतक्या भाषा निर्माण झाल्या नाहीत. याचा अर्थ आपला मेंदू बराच काळ क्रियाशील राहिलेला आहे. आणि आता आपण तो थिजवू पाहतो आहोत.
स्वतःच्या भाषेचा अभिमान असणे खूप महत्वाचे आहे. पण त्याचा दुराग्रह होता कामा नये. आज प्रादेशिक भाषेची परिस्थिती अभिमानाकडून दुराग्रहाकडे वाटचाल करत आहे. एक कानडी म्हण आहे, ज्याचे भाषांतर "दोघात भांडण, तिसऱ्याचा लाभ" असे होते. आपल्या देशात निश्चितच उत्तम आणि अवघड भाषा आहेत. मात्र दुर्दैवाने, आपण आज इथवर येऊन पोचलो आहोत की इंग्लिश बोलणे हा एकमेव उपाय राहिला आहे. आपण आपापसात जुळवून घेत नसल्याने परकीय भाषेचा फायदा होतो आहे.
आज जवळजवळ प्रत्येक ठिकाणी इंग्लिश भाषा वापरली जाते, त्यामुळे हे ही खरे आहे की इंग्लिश भाषा आली नाही तर तुम्हाला अपंग झाल्यासारखे वाटेल. म्हणून मी वेगवेगळ्या राज्यांच्या सरकारला शिफारस करत आहे की प्रत्येक मुलाला दोन भाषा लिहिता वाचता आल्या पाहिजे. त्यातील एक निश्चितपणे मातृभाषा असायला हवी आणि दुसरी भाषा इंग्लिश असायला हवी. कारण इंग्लिश भाषा ही तुमची जगात प्रवेश करण्याची गुरुकिल्ली आहे. जोडीला अजून दोन तीन बोलीभाषांची ओळख करून देता येईल.
ज्यांनी स्थानिक भाषेतून शिक्षण घेतले आहे असे बरेचसे तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधील लोक देशातील इतर राज्यात जायला कचरतात, कारण ते तिथली भाषा बोलू शकत नाहीत. आपण सगळेजण जर कमीत कमी पाच भाषा बोलू शकलो तर खूप चांगले होईल. त्यामुळे माणूस बहुमुखी होईल आणि इतर राज्यात प्रवास करायला सक्षम बनेल. परिणामी आपल्या देशात अधिक एकता येईल आणि आपण आपली सांस्कृतिक पाळेमुळे टिकवून ठेवू शकू.
भारत जणू एक कॅलिडोस्कोप आहे. हा कॅलिडोस्कोप आकर्षक आणि सुरेख बनवण्याची, त्यामध्ये कोणताही संघर्ष नसण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या देशाचे रूप हे असेच आहे आणि ते आपण तसेच ठेवले पाहिजे.
(या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखातील व्यक्त झालेली मते संबंधित लेखकाची स्वतःची आहेत. एबीपी माझा किंवा एबीपी नेटवर्कची ही मते किंवा भूमिका नाही.)