BLOG : पंडित बिरजू महाराज आणि कोल्हापुरातील भारावलेले ते तीन दिवस
BLOG : एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात एकदाच येते आणि तुमचं आयुष्य समृद्ध करुन जाते. आज पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज गेल्याची बातमी ऐकली आणि सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
रंकाळा महोत्सव 2005
तेव्हा मी गायन समाज देवल क्लब कोल्हापूर येथे नृत्यशिक्षिका म्हणून कार्यरत होते, तेव्हा रंकाळा महोत्सवासाठी महाराजजी येणार असल्याची बातमी कळली. हे कमी म्हणून की काय त्यांच्या संपूर्ण तीन दिवसांच्या कार्यक्रमाची जबाबदारी देवल क्लबकडे होती. आणि माझ्याकडे त्यांच्या रिहर्सल आणि कार्यक्रमाच्या दिवशीची.
मला अगदी लख्ख आठवतंय.. पंडित बिरजू महाराज त्यांच्या साथीदारांबरोबर देवल क्लबच्या सभागृहात आले. जवळपास दोन एक तास त्यांचा रियाज चालू होता. बिरजू महाराज समोर रियाज करताहेत यावर मला विश्वासच बसत नव्हता. त्यांचा पदन्यास, त्यांची नृत्यातली नजाकत... अहाहा ... फक्त बघत रहावं. बरं झालं तेव्हा मोबाईल नव्हते, कारण आज जे माझ्या हृदयात कोरलं गेलंय, त्याची अनुभूती मी आजही घेवू शकते. महाराजजी न कळत देत होते आणि मी अधाश्यासारखी फक्त आणि फक्त हृदयात त्यांचा एक एक शब्द कोरुन घेत होते.
माहित नाही त्या रियाजावेळी काय झालं होतं. त्यांचे शिष्य देखील स्तब्ध होते. पदन्यास, पढंत, कार्यक्रमाची रुपरेषा सगळं झालं तरीही त्यांचा रियाज चालूच होता. मग त्यांनी तबल्यावर काही तुकडे वाजवले. एक दोन नव्या बंदिशीच होत्या त्या! त्यानंतर त्यांनी हार्मोनियम हातात घेतली आणि पुढचा अर्धा तास आम्ही फक्त त्यांचं गाणं ऐकत होतो. कोणती तरी पुण्याई नक्कीच होती की त्यावेळी मी तिथे होते. माझ्या डोळ्यांनी सगळं बघत होते अनुभवत होते... जगत होते.
शेवटी त्यांच्या शिष्यांनी न रहावून सांगितले की, महाराजजी थोडं जेवून घ्या. थोडा आराम करा. त्यावर पंडित बिरजू महाराज म्हणाले की, आज मला कलाक्षेत्रातील सगळ्या महारथींसमोर माझी कला सादर करायला मिळाली आहे. ही संधी मी कशी सोडू? एक क्षण कोणालाच काही कळाले नाही. कारण त्या सभागृहात 10 च्या वर कोणीच नव्हंत आणि पटकन सगळ्यांच लक्ष सभागृहात लावलेल्या 50 एक तैलचित्रांकडे गेले.
अल्लादियाखाँ साहेब, रामकृष्णबुवा वझे, भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, केसरबाई केरकर, गंगूबाई हनगल, जितेंद्र अभिषेकी.... किती किती म्हणून नावे घ्यावीत... जणू प्रत्येक जण त्या दिवशी फोटोंमधून फक्त पंडित बिरजू महाराज यांच्याकडे पाहत होता.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रंकाळा तलावाकाठी कार्यक्रम होता. लोकांनी खचाखच भरलेली ती बाग या पूर्वी मी तरी कधीच पाहिली नव्हती.
बॅकस्टेजची, त्यांना हवं नको ते पाहण्याची सगळी जबाबदारी माझ्याकडे होती. पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त होता. अंबाई टॅंकच्या गेटमधून त्यांच्या गाड्या आत आल्या. दोन खोल्यांमध्ये ते आणि त्यांचे साथिदार तयारी करत होते. दोनदा त्यांनी मला आत बोलावून कामं सांगितलं, माईक आणि तबला सेटींग बाबत सूचना दिल्या. मी फक्त त्यांचा प्रत्येक शब्द झेलत होते भारावल्यागत.... मला कधी एकदा त्यांना स्टेजवर परफॉर्म करताना पाहीन असं झालं होतं.
सवाई गंधर्व महोत्सवात पंडित बिरजू महाराज यांना पाहिलं होतं. पण फार मागे बसून आणि तेही स्क्रीनवर... आज माझी इच्छा पूर्ण होणार होती, अगदी जवळून त्यांचं सादरीकरण पाहता येणार होतं. या सगळ्या विचारात असतानाच मला परत आत बोलावलं. महाराजांना कॉफी हवी आहे, कुठे मिळेल का? असं दिदींनी विचारलं. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मुळातली जुगाडू वृत्ती जागी झाली आणि मी बिना साखरेची कॉफी घेण्यासाठी तिथेच जवळ असलेल्या आईच्या मैत्रिणीकडे गेले. कॉफी घेऊन येइतो अर्धा पाऊण तास झाला होता. सगळ्या पोलिसी बंदोबस्तातून कशीबशी स्टेज मागे पोचले तर कार्यक्रम सुरु झाला होता. दिदी स्टेजवर होत्या आणि महाराजजी पढंत करत होते. मी पटकन स्टेजच्या बाजूला गेले आणि त्यांना कॉफी दिली. त्यांची टीम सोडून बाजूला अजून दोघे माझ्या ओळखीचे होते. त्यांना हळूच म्हणाले, महाराजजी कधी उभे राहणार नृत्यासाठी? त्यावर त्यांनी अगदी सहज सांगितले आताच तर झाला महाराजजींचा परफॉर्मन्स. तू कुठे होतीस ?
काय बोलावं तेच सूचेना. ज्या क्षणाची इतक्या आतुरतेने वाट पहात होते तो क्षण असा निसटून जावा.. डोळ्यात आसवं जमा झाली होती काहीच सूचेना.. दोन मिनिटे तिथेच उभी राहिले.. आणि माहित नाही पण काय झालं, मी महाराजजींच्या पेटीसंगत करणाऱ्यांना म्हणाले, मला मयूर गत बघायची होती ती केली का त्यांनी? नही, 'आज के प्रोग्रॅममें वो नहीं थी' असं उत्तर आलं. मी काहीच न बोलता स्टेजसमोर येऊन उरलेला कार्यक्रम बघू लागले ... पण मन हिरमुसलं होतं.. जवळपास पाऊण तास कार्यक्रम चालला. पण माझं लक्ष मात्र कुठेच लागेना. दिदींनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. तेवढ्यात महाराजजी उठले स्टेजवर आले आणि माईक हातात घेतला... म्हणाले अभी एक छोटी परफॉर्मन्स बाकी है ... मयूर गत .... किसीकी फरामाईश है ....
प्रचंड टाळ्या ... माझा माझ्या कानांवर डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता... जवळजवळ 10 मिनिटे ही गत चालू होती. डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे दोन मिनिटे तर मला काही दिसत नव्हतं... कधी यूट्यूबवर मयूर गत पाहता आली तर नक्की पाहा .. मोराची चाल आणि त्यांच्या पिसाऱ्याचा डौल.. निव्वळ लाजवाब!
प्रचंड टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाची सांगता झाली.. जवळपास दोन तास ते त्यांच्या चाहत्यांना भेटत होते, फोटो काढून घेत होते. मी खोलीबाहेर शांत उभी होते. तेवढ्यात मला आतून बोलावणं आलं. आपल्या गृपचा फोटो काढायचाय. मी आत गेले तर महाराजजींनी मला बोलावून त्यांच्या शेजारी बसवलं. आणि मग फोटो काढला. तोच हा फोटो. उत्साहित होण्याचं ते वय होतं पण मी खूप शांत होते. हळूहळू गर्दी कमी झाली. मोजकीच लोकं शिल्लक राहिली. माझ्या ग्रुपमधली पण मीच एकटी मागे राहिले होते. खरतर माझा पायच निघत नव्हता..
तेवढ्यात तिथेच एक रांगोळीचे प्रदर्शन बघण्याचा आग्रह महाराजजींना केला. ते लगेच तयार झाले. तिथे त्यांच्या पोजच्या रांगोळी बरोबर उभे राहून तशीच पोज देऊन कलाकारासोबत बरोबर फोटो देखील काढला. 'इतनी अच्छी पोज तो मै भी नहीं दे पा रहा हू जितनी अच्छी आपने रंगोली बनाई है' अशी दाद त्यांनी दिली.
अखेर ते भारावलेले दोन दिवस संपले आणि महाराजजी परत जाण्यासाठी गाडीत बसले. त्यावेळी त्यांनी मला जवळ बोलावून माझं नाव विचारलं आणि काय करतेस विचारलं.. तो त्यांचा आणि माझा गेल्या दोन दिवसातला पहिलाच संवाद! मी माझं नाव सांगितले आणि मी कथक शिकते हे कळल्यावर ते फारच खूश झाले. परत दुसऱ्या दिवशीसुध्दा त्यांना भेटण्याचा त्यांना अलविदा करण्याचा योग आला. पुढे मुंबईत शिफ्ट झाल्यावर नेहेरु सेंटरला, भवन्स कॉलेजला त्यांच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले. कोल्हापूर की गायत्री म्हणून ते मला हाक मारायचे.
कलाकार म्हणून तर ते श्रेष्ठच होतेच पण माणूस म्हणून त्यांचे एक एक पैलू असे दिसले की मी फक्त नतमस्तक होत होते. माझ्यासारख्या अल्पमती शिष्याला जितकं घेता आलं तितकं मी घेतलं. फक्त कलाच नाही तर त्यांचं माणूसपण...आज पंडित बिरजू महाराज आपल्यात नाहीत. पण माझ्यासारख्या असंख्य शिष्यांच्या मनात ते कायम जिवंत राहतील मार्गदर्शन करत राहतील.