BLOG : अर्ध्या मताची किंमत....आणि विलासरावांचं मुख्यमंत्री पद
BLOG : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरूद्ध भाजप कशी रंगतदार स्थितीत पोहचली हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं. असाच थरार रंगला होता 1996 च्या विधान परिषद निवडणुकीत.
नेमकं काय झालं होतं? त्यावेळी त्याची कहाणीही रंजक आहे. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना धोबीपछाड देत शिवसेना - भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावाती प्रचारामुळे आणि गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक प्रचारात शरद पवारांना लक्ष्य केल्यामुळे घसघशीत 137 जागांसह राज्यात युतीचं सरकार स्थापन झालं होतं. या निवडणुकीत सेनेचे कट्टर विरोधक छगन भुजबळ यांना त्यांच्याच माझगावात एका युवा शिवसैनिकाने म्हणजे बाळा नांदगावकरांनी धूळ चारली होती. जायंट किलर बाळा नांदगावकरांना याचं बक्षीस म्हणून गृहराज्यमंत्री पद सुद्धा मिळालं होतं. तर विलासरावांना त्यांचंच होम ग्राऊंड असलेल्या लातूर मतदारसंघात शिवाजीराव कव्हेकरांकडून पराभवाची चव चाखावी लागली होती. त्यानंतर मार्च 1996 मध्ये विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. पराभूत झालेल्या नेत्याचं पुनर्वसन करण्यासाठी ही चांगली संधी होती. त्यात काहींना संधी मिळाली मात्र काहींच्या पदरी निराशाच आली. ज्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली त्यात दिवंगत विलासराव देशमुखांचा समावेश होता. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे विलासरावांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
निवडणूक कार्यक्रम
रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951 च्या नियमानुसार या निवडणूक घेतल्या जातात. ज्यात निवडून येण्यासाठी कोटा दिला जातो. विधान परिषदेसाठी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेतले जाते. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. 3 एप्रिल 1996 हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. 6 एप्रिल 1996 हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. तर 15 एप्रिल 1996 सोमवार सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान आणि दुपारी 4 वाजल्यापासून मतमोजणी होणार होती. 9 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. विजयासाठी उमेदवारांना 29 मतांचा कोटा होता.
तत्कालीन उमेदवार
1. छगन भुजबळ (काँग्रेस)
2. शिवाजीराव देशमुख (काँग्रेस)
3. रामदास फुटाणे (काँग्रेस)
4. रवींद्र मिर्लेकर (शिवसेना)
5. शिशिर शिंदे (शिवसेना)
6. प्रकाश देवळे (शिवसेना)
7. अण्णा डांगे (भाजप)
8. निशिगंधा मोगल (भाजप)
9. विलासराव देशमुख (अपक्ष)
10. भय्यासिंग ऊर्फ लालसिंग राठोड (अपक्ष)
11. गणपतराव देशमुख (अपक्ष)
12. कन्हैयालाल गिडवाणी (अपक्ष)
6 एप्रिल 1996 हा दिवस उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा असताना एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे आता निवडणूक अटळ होती. विलासराव देशमुखांनी बंडखोरी करत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर ही निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत ज्या लालसिंग राठोड आणि विलासराव देशमुखांमध्ये रंगली होती. ते राठोड एक्साईजचे माजी अधिकारी होते. एक अधिकारी इतक्या ताकदीने निवडणुकीत उतरल्यामुळे चर्चा जोरात होती.
निवडणूक प्रत्यक्षात पाहणाऱ्यांचं काय मत?
हा ब्लॉग लिहिण्यासाठी ही निवडणूक प्रत्यक्षात पाहणाऱ्या अनेक नेते आणि पत्रकारांबरोबर चर्चा केल्यानंतर समोर आलेली माहिती. 1995 च्या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाल्यानंतर लगेचच लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आपलं पुनर्वसन व्हावं अशी अनेकांची इच्छा होती. मात्र काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह होता कि जे विधानसभेला पराभूत झालेत त्यांना उमेदवारी द्यायची नाही. दुसरा मतप्रवाह होता कि या निवडणुकीत एकाच प्रकारच्या लोकांना संधी मिळायला नको, वेगवेगळ्या समाजातील लोकांना संधी दिली पाहिजे. त्यावेळी सुशिलकुमार शिंदे हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते. शरद पवारांनी छगन भुजबळांचं नावं पुढे केलं. भुजबळांना उमेदवारी मिळाली मात्र विलासराव देशमुखांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे विलासरावांनी बंडखोरी केली आणि सेनेच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. विलासराव देशमुख हे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार असले तरी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी त्यांचा पराभव कसा होईल यासाठी प्रयत्न करत होते तर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विलासरावांचे जिवलग मित्र गोपीनाथ मुंडे हे विलासरावांच्या विजयासाठी प्रयत्न करत होते.
तत्कालीन पक्षीय बलाबल
काँग्रेस – 80
शिवसेना – 73
भाजप – 65
जनता दल – 11
शेकाप – 6
सीपीआय – 3
समाजवादी पक्ष – 3
नाग विदर्भ आंदोलन समिती – 1
महाराष्ट्र विकास काँग्रेस – 1
अपक्ष – 45
प्रत्यक्षात निवडणुकीचा दिवस
जनता दलाचे बाळासाहेब अग्ने यांनी पूर्वीच आणि अपक्ष उमेदवार कन्हैयालाल गिडवाणी मतदानाच्या सकाळी निवडणुकीतून आपली माघार जाहीर केली होती. छगन भुजबळांना काँग्रेसने 22 मतांचा कोटा दिलेला असताना भुजबळ सर्वाधिक 36 मते मिळवून पहिल्याच फेरीत विजयी झाले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भुजबळांच्या पाठोपाठ शिवसेनेचे रवींद्र मिर्लेकर (29), शिशीर शिंदे (30), भाजपच्या निशिगंधा मोगल (31), अण्णा डांगे (30) मतं घेत विजयी झाले.
काँग्रेसचे शिवाजीराव देशमुखांना पहिल्या पसंतीची 27 मते असल्यामुळे भुजबळांची अतिरिक्त तीन मते मिळाली त्यामुळे दुसऱ्या फेरीत ते विजयी झाले. आता निवडणूक रंगतदार स्थितीत आली होती. मतमोजणीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या फेरीत कोणताही उमेदवार विजयी झाला नाही. सहाव्या फेरीत पहिल्या पसंतीची 23 मते असलेले काँग्रेसचे रामदास फुटाणे विजयी झाले तर शेकापचे गणपतराव देशमुख बाद झाले. सातव्या फेरीत अपक्ष उमेदवार विलासराव देशमुख आणि लालसिंग राठोड यांच्यात अटीतटीचा सामना सुरू होता. विलासराव देशमुखांना पहिल्या पसंतीची 19 तर लालसिंग राठोडांना साडे एकोणीस मते होती. लालसिंग राठोड आणि विलासराव देशमुखांना अनुक्रमे 2468 आणि 2409 मते होती. राठोडांना असलेल्या अधिकच्या 0.59 म्हणजेच अर्ध्या मतामुळे विजयी घोषित करण्यात आले आणि विलासराव देशमुखांचा पराभव झाला. विधानसभेपाठोपाठ पक्षातून बंडखोरी करून लढलेली विधान परिषदेत ही पराभव होणं हे एखाद्या नेत्याच्या राजकीय कारकिर्दीवर पूर्ण विराम लागल्यासारखं होतं.
रामदास फुटानेंनी दुसऱ्या पसंती क्रमांकावर केलेल्या चारोळी
आंधळया भरवश्याला
दगा फटका टळत नाही
हवेतच बाण मारल्याने
ग्राऊंड रिॲलिटी कळत नाही
हळूहळू घरात घुसत
नंबर एकला पाणी पाजते
पत्नी, संपत्ती, मतपत्रिका
नंबर दोनचीच गाजते
विधान परिषदेला पडलो म्हणून मुख्यमंत्री झालो!
विधानसभेपाठोपाठ पक्षातून बंडखोरी करून लढलेली विधान परिषदेत ही पराभव होणं हे एखाद्या नेत्याच्या राजकीय कारकिर्दीवर पूर्ण विराम लागल्यासारखं होतं. पण विलासरावाचं कमबॅक सर्वांना अचंबित करणारा होता. बंडखोरी केल्यामुळे विलासराव देशमुखांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. जवळपास एक वर्ष विलासराव देशमुख सक्रिय राजकारणापासून दूर होते. अनेकांनी विलासराव राजकारणातून संपल्याच्या चर्चा सुद्धा करून झाल्या होत्या. पण “मला कॉग्रेसमधून काढलं तरी माझ्या रक्तातून काँग्रेस कशी काढणार” असा सवाल विलासरावांनी त्यावेळी विचारला होता. साधारण एका वर्षानंतर त्यांना पुन्हा पक्षात स्थान मिळालं. 1999 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 1998 ला विलासरावांना महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख पद देण्यात आले. 1999 साली महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी विलासराव देशमुख विधानसभेवर निवडणूक गेले आणि मुख्यमंत्री झाले. अनंत कळसे यांनी सांगितलेला एक प्रसंग असा, विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर कळसेंना मिठी मारली. आणि म्हणाले कळसे विधान परिषद निवडणुकीला तुम्ही निवडणूक अधिकारी होतात. अर्ध्या मताने माझा पराभव झाला म्हणून मी आज मुख्यमंत्री होऊ शकलो. विलासराव देशमुखांनी पुढे 1999 ते 2003 आणि 2004 ते 2008 असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलं. वसंतराव नाईकांनंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा मान त्यांना मिळाला. विलासरावांबद्दलचा हा घटनाक्रम असला तरी क्रिकेटमध्ये जसा नेट रनरेट महत्त्वाचा असतो आणि काही पॉईंट्सनी एखादा संघ स्पर्धेतून आऊट होतो किंवा पुढे कूच करतो. तसंच अर्ध्या मताची किंमत अधोरेखित करणारी निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं. सध्याच्या राजकीय घमासानात अशा अर्ध्या मताचं मोल वेगळं सांगायला नको.