मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
नवीन डबल डेकर ब्रीज उभारणीच्या कामामुळे तिथल्या काही जुन्या बैठ्या चाळी देखील बाधित होणार आहेत.

मुंबई : राजधानी मुंबई म्हणजे उंचच उंच इमारती आणि मोठ-मोठाले उड्डाण पूल. गावाकडून मुंबई (Mumbai) दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना, पर्यंटकांना मुंबईच्या या गोष्टीचं मोठं आकर्षण असतं. त्यातच, आता पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबईत मोठा बदल असून विकासकामे जोमाने सुरू आहेत. सी.लिंक असेल किंवा कोस्टल रोड असेल हे मुंबईच्या वैभवात भर टाकणारे आहे. त्यातच, आता परळ येथील एलफिस्टन पूल हा 100 वर्ष जुना ब्रिटिशकालीन लोखंडी पूल आहे. एमएमआरडीए उभारत असलेल्या शिवडी वरळी कनेक्टर रस्त्याच्या प्रकल्पात या जुन्या पुलाचे पाडकाम करुन त्या ठिकाणी नवीन डबल डेकर ब्रिज (Bridge) बनवण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यासाठी 10 एप्रिल पर्यंत वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाल्यास एमएमआरडीए हा पूल वाहतुकीसाठी बंद करून पाडकामाला सुरुवात करणार आहे. मात्र, स्थानिकांना विश्वासात न घेतल्याने नागरिकांनी आता संताप व्यक्त केला आहे.
नवीन डबल डेकर ब्रिज उभारणीच्या कामामुळे तिथल्या काही जुन्या बैठ्या चाळी देखील बाधित होणार आहेत. मात्र, असे काम करण्याच्या आधी कोणत्याही माध्यमातून स्थानिकांना विश्वासात घेतले नसून या प्रकल्पाबद्दलची कोणतीही माहिती स्थानिकांना दिली नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. एलफिस्टनचा ब्रिज बंद केल्यास स्थानिक नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागणार असून त्यामुळे दादर-परेल-करी रोड या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होणार आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, तसेच ज्यांना रोज या पुलाचा वापर करून पूर्व पश्चिमेला जावे लागते अशा सर्व स्थानिकांना मोठा त्रास होणार आहे. परळ भागात केईएम, टाटा आणि वाडिया हॉस्पिटल असल्यामुळे अनेक रुग्णांना देखील याचा फटका बसेल. त्यामुळे आधी स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रकल्पाची माहिती द्यावी आणि नंतरच हा पूल बंद करावा अशी मागणी स्थनिकांनी केली आहे. मनसेने देखील हा मुद्दा उचलून धरला असून आधी पादुचारी फुल आणि आवश्यक गोष्टींची पूर्तता करावी मगच या कामाला सुरुवात करावी अशी मागणी केली आहे.
कसा आहे हा प्रकल्प ?
याठिकाणी डबल डेकर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. खालचा पूल पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा असेल तर वरचा मार्ग शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूला जोडला जाणार आहे. एमएमआरडीएने 4.5 किमीचा उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव तयार केला असून या पूलामुळे अटल सेतूवरील वाहनांना थेट वरळी किंवा दक्षिण मुंबई आणि वांद्र्याच्या दिशेने प्रवास करणे सोपे जाणार आहे. एल्फिस्टन ब्रिज 13 मीटर रुंद आहे आणि प्रत्येक दिशेने फक्त 1.5 लेन वाहून नेतो. मात्र, नवीन पुलावर चार लेन असणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. या ठिकाणी पहिल्यांदाच मुंबईतील डबल डेकर लोखंडी उड्डाणपूल भरणातील ज्याचे वजन तब्बल 3000 मेट्रिक टन असणार आहे. पावसाळ्याच्या आधी जुन्या पुलाचे पाडकाम करुन 2026 च्या शेवटपर्यंत दोन पैकी एका पुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
