BLOG | आता ' बर्ड फ्लू'!
वैद्यकीय तज्ज्ञांचे मते, मानवाला या आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. मात्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आजाराचा नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसले तरी दक्ष राहणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या संकटाचा शेवट जवळ आला असताना आता नव्या संकटाने डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात ' बर्ड फ्लू ' या साथीच्या आजाराने शिरकाव केला आहे. परभणी येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला असून त्या याच आजाराने मृत्यू पावल्याचे प्रशासनातर्फे सांगितले आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, दापोली आणि बीड या जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या घटना आढळून आल्या. सध्या या आजराचे सावट देशातील सात राज्यात असून आता त्यांच्यामध्ये महाराष्ट्राची भर पडली आहे. 2006 साली सुद्धा नंदुरबार जिल्ह्यात अशाच पद्धतीने या आजाराची सुरुवात देशात महाराष्ट्रातून झाली होती. त्यावेळी या भागातील मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची कत्तल करण्यात आली होती. बर्ड फ्लू' म्हणजे एव्हियन इन्फ्लूएन्झा. वैद्यकीय तज्ज्ञांचे मते, मानवाला या आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. मात्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आजाराचा नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसले तरी दक्ष राहणे गरजेचे आहे.
दोन दिवसांपूर्वी परभणी येथील मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाला होता. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाने तत्काळ गावात धाव घेऊन उपायोजना करता पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. तिथून हे नमुने भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. त्यात 'बर्ड फ्लू' मुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. बर्ड फ्लू' हा आजार ' एच 4 एन 1' या विषाणूमुळे होतो. प्राथमिकता हा विषाणू कोंबड्या, कावळे, बदक आणि स्थलांतरित पक्षांमध्ये आढळतो. राज्य प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी, राज्याच्या पशु, दुग्धविकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय पारकळे यांनी ए बी पी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, " परभणी येथील मुरंबा या गावातील एका पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लूच्या केसेस आढळून आल्या आहेत. त्या परिसराच्या 1 किलोमीटर अंतरातील जे काही पोल्ट्री फार्म असतील त्या कोंबड्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या परिसरात सर्वसाधारण 9-10 हजार कोंबडया आहेत. त्याचप्रमाणे राज्यात सर्वच ठिकाणी प्रतिबंधात्मक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याच्या इतर भागात जे काही पोल्ट्री फार्म आहेत त्यानं दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. छतावर असलेली पाण्याची टाकी किंवा खिडकीत पक्षांना पिण्यासाठी पाणी ठेवणं हे टाळलं पाहिजे. कुणी त्या पोल्ट्री फार्ममध्ये काम करणारे लोक असतील त्यांनी पी पी इ किट घालावेत य संदर्भाने सूचित करण्यात आले आहे. कारण हे विषाणू विष्टेच्या द्वारे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी कोंबड्याचे मटण खातातं ते व्यवस्थित शिजवून खावे. विशेष खबरदारी त्या वेळी घ्यावी, तेव्हा ते मटण धुऊन घेतील त्यावेळी ग्लोव्हसचा वापर करावा. तसेच कोंबड्या कापताना सुद्धा ग्लोव्हस आणि गॉगल घालावेत जे ने करून त्यांचा रक्ताशी थेट संबंध येणार नाही."
कोरोनाची नागरिकांमधील भीती दूर होत असतानाच बर्ड फ्लूच्या नव्या आजराने पुन्हा एकदा खळबळ माजविली आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचं आजार येऊन गेला असल्याने कोणत्या खबरदारी घ्यायची याची पूर्ण माहिती प्रशासनाकडे आहे. त्याविषयी इतर राज्यात ज्यावेळी बर्ड फ्लूच्या घटना आढळून आल्या होत्या तेव्हापासूनच राज्यातील पशु संवर्धन विभागाने याबाबतीतील संपूर्ण जय्यत तयारी करून ठेवली होती. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करण्यास याचा फायदा होणार आहे. ज्या व्यक्तींना मोठ्या संख्येने असे पक्षी मरताना आढळतील त्यांनी याची माहिती त्वरित स्थानिक प्रशासनाला देणे गरजेचे आहे.
सध्याचे राज्याचे वैद्यकीय सल्लागार आणि जागतिक आरोग्य परिषदेच्या साऊथ आशिया विभागीय कार्यालयात 4 वर्षे सहाय्यक विभागीय संचालक म्हणून काम पाहणारे डॉ सुभाष साळुंखे सांगतात की, " पहिली गोष्ट म्हणजे या आजराबद्दल नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. या आजराचा संसर्ग माणसांना होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य असे आहे. मागच्या वेळेस 2006 साली नंदुरबार, नवापूर येथे बर्ड फ्लू ची साथ आली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात त्याभागातील कोंबड्याची कत्तल करण्यात आली होती. त्यावेळी जागतिक आरोग्य परिषदेचा प्रतिनिधी म्हणून पाहणी करण्यास आलो होतो. त्यावेळी या आजराचा कोणत्याही व्यक्तीला संसर्ग झाला नव्हता. मात्र नागरिकांनी जिवंत पक्षापासून थोडं लांब राहावे. या आजारवरची उपचारपद्धती आपल्याकडे आहे. त्यामुळे न घाबरता सतर्क राहिले पाहिजे. त्याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी इंडोनेशिया मध्ये सुद्धा बर्ड फ्लूचा कहर झाला होता त्यावेळी मी तिकडे गेलो होतो. तेथे स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन तो आजार थांबविण्यात यश आले होते. या साथीच्या आजारा विरोधातील कोणत्या उपाय योजना करायचा आहे याची माहिती आपल्याकडे आज उपलब्ध आहे."
तर " यापुढे चिकन खाताना आणि बनविताना विशेष काळजी घ्यावी. विशेष करून चिकन बारबेक्यू करताना ते व्यवस्थित काळजी घ्यावी. स्वाईन फ्लू, कोरोना काळात ज्या सूचना आहे तेच सुरक्षिततेचे नियम बर्ड फ्लू साठी लागू आहेत. हात स्वच्छ धुवावेत आणि मास्क लावावे हे साथीच्या आजारात असणाऱ्या या गोष्टी आहेत. याचा संसर्ग मानवाला होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे पण होणारच नाही असे सांगू शकत नाही. त्यामुळे पोल्ट्री फार्म मध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांनी याची काळजी घ्यावी." असे मुंबई येथील के इ एम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे सांगतात.
साथीचे आजार राज्यात केव्हाही येऊ शकतात आणि त्याची व्यापकता मोठी असण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोना काळातील या आजाराचा कहर पाहता राज्यात साथीच्या आजारावरील मोठे रुग्णालय संशोधन संस्था उभी करणे गरजेचे झालेले आहे. त्यामुळे कुठलाही साथीचा आजार आला तर त्याला प्रतिबंध करण्याची सर्व यंत्रणा आपल्याकडे सज्ज असेल. सध्या तरी या बर्ड फ्लूच्या या आजाराला नागरिकांना घाबरण्याची गरज नसली तरी शेवटी तो संसर्गजन्य आजार आहे. पक्षांपासून दूर कसे राहता येईल याची काळजी घ्यावी लागणार आहे.