Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची 2021 सालीच पक्षातून हकालपट्टी केल्याचे स्पष्टीकरण भाजपने दिले आहे.

Satish Bhosale : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाई याने शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर त्याचे नवनवीन कारनामे दररोज उघडकीस येत आहेत. सतीश भोसलेच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचे घबाडदेखील वनविभागाला सापडले आहे. एकीकडे सतीश भोसलेच्या अटकेची मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे तो भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आल्यानंतर पक्षाची प्रतिमा मलीन झाली होती. आता सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची 2021 सालीच पक्षातून हकालपट्टी केल्याचे स्पष्टीकरण भाजपने दिले आहे.
भाजप भटके विमुक्त आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव यांनी म्हटले आहे की, दोन-तीन दिवसापासून सतीश भोसले उर्फ खोक्या याच्याबाबत माध्यमांमध्ये बातम्या सुरू आहेत. सतीश भोसलेने भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांना जातीची खोटी माहिती सांगून भटक्या विमुक्त युवा आघाडी राज्य उपाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र घेतले होते. सतीश भोसले हा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे. तो अनुसूचित जमातीमध्ये मोडतो. भटके विमुक्त प्रवर्ग हा वेगळा आहे. तरीदेखील त्याने चुकीची माहिती सांगून पद मिळवले होते. मला हे कळल्यानंतर मी 2021 साली त्याची पदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर तो पक्ष विरोधी कारवाई, खंडणी, अपहरण असे प्रकार करत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्याच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देखील घेतला होता. सध्या तो कुठल्याही पदावर नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
नेमका कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद होते. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले.अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे. सतीश भोसलेने शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. सतीश भोसलेने केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान खोक्या भाईला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.
आणखी वाचा
























