एक्स्प्लोर

अस्वस्थ काश्मीरची निवडणूक अनुभवताना...

जम्मू आणि काश्मीर या राज्यात लोकसभेच्या एकूण सहाच जागा आहेत. त्यामुळे इथे काय होतं याने राष्ट्रीय पक्षांना फारसा फरक पडत नसावा. पण प्रचारामध्ये याच काश्मीरशी निगडीत अनेक मुद्द्यांचा मात्र देशात इतरत्र वातावरण तापवण्यासाठी वापर केला जातो.

ज्या काश्मीरचा उल्लेख यंदाच्या निवडणूक प्रचारात सर्वाधिक होतोय, तिथे निवडणूक नेमकी कशी सुरु आहे. ज्या मुद्यांवरुन देशात वातावरण तापवलं जातंय, ते काश्मिरी जनतेच्या किती जिव्हारी लागतायत, हे प्रश्न निवडणूक जाहीर झाल्यापासूनच पडत होते. मागच्या दोन वर्षांपासून इथे निवडणूक ही केवळ एक प्रक्रिया म्हणूनच उरकली जातेय. कारण पोटनिवडणुकीच्या वेळी 7 टक्के, पंचायत निवडणुकीच्या वेळी अवघं 4 टक्केच मतदान झालं. त्यामुळेच काश्मिरी जनतेच्या अंतरंगात काय चालू आहे, हे समजून घेणं महत्वाचं वाटत होतं.

श्रीनगरपासून 15 ते 20 किमी अंतरावर असलेल्या बडगाममध्ये मतदानाची स्थिती काय आहे हे, पाहण्यासाठी आम्ही पोहोचलो. एका मतदान केंद्रावर तिथल्या स्थानिक पत्रकारांशी बातचीत सुरु होती, तितक्यात सुरक्षारक्षकांच्या ताफ्यात प्रचंड हालचाल सुरु झाली. एक-दोन गाड्या वेगानं शेजारच्या रस्त्यानं निघाल्या. काय प्रकार आहे अशी चौकशी केल्यावर आमच्या ड्रायव्हरनं सांगितलं, की पलीकडच्या मतदान केंद्रावर दगडफेक सुरु झालीये. आम्हीही तातडीनं गाडीत बसून या ताफ्याच्या मागोमाग निघालो. थोड्या अंतरावर पोहचल्यावर जे दृश्य पाहिलं ते मी कदाचित आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही. रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या गर्द झाडीतून जवळपास दहा ते बारा युवक मतदान केंद्राच्या दिशेनं जोरजोरात दगडफेक करत होते. त्यातल्या अनेकांनी आपले चेहरे झाकलेले होते. दुसऱ्या बाजूला लष्कर, पोलिसांचा ताफा त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला त्यांनी माईकवरुन शांततेचं आवाहन केलं, पण त्यानंतरही दगडांचा वर्षाव थांबायला तयार नाही म्हटल्यावर पथकातले काही लोक पुढे सरसावले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या, हवेत गोळीबारही करण्यात आला. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे ही सगळी धुमश्चक्री सुरु होती. आमच्या बाजूला दहा ते पंधरा पावलांच्या अंतरावरच हे सगळं सुरु होतं.

आमचा कॅमेरा हे सगळं शूट करतोय हे दिसल्यावर एका युवकानं आमच्या दिशेनंही दगड भिरकावले. शेजारी तिथल्या ज्येष्ठ नागरिकांचा एक गट जो इतकावेळ लष्करावर होणारी दगडफेक निमूटपणे पाहत होता, तो आमच्या दिशेनं दगड भिरकावल्यावर चवताळला. त्यांच्यातले दोन जण पुढे येऊन त्या युवकांना काश्मिरी भाषेत जोरजोरात सुनावू लागले. या लोकांना हात लावून तर पाहा, अशा पद्धतीचा काहीतरी इशारा ते देत असावेत. कारण त्यांच्या एकाच इशाऱ्यानंतर आमच्या दिशेनं येणारी दगडफेक थांबली. आम्ही कृतज्ञ डोळ्यांनीच त्यांचे आभार मानले. पण हे चित्र बराच काळ डोळ्यासमोरुन हटत नव्हतं. कृती तशी छोटीशीच, पण काश्मिरींबद्दल अनेकांचे गैरसमज दूर करायला पुरेशी आहे. एकतर या लोकांचा सगळा रोष व्यवस्थेविरोधातला आहे, पण आपल्यामुळे सामान्य लोकांना, त्यातही जे लोक काश्मिरच्या बाहेरुन येतात त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, ही त्यांची काळजी असते. पर्यटन हेच काश्मिरींच्या रोजगाराचं प्रमुख साधन असल्यानं त्यांना ते महत्वाचं वाटत असावं.

अस्वस्थ काश्मीरची निवडणूक अनुभवताना...

काश्मीर खोऱ्यातल्या मतदानाचा दिवस होता, पण वातावरणात कुठंही त्याचं प्रतिबिंब दिसत नव्हतं. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाची वेळ सुरु झाली होती. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो, त्याच्याच शेजारी बर्न हॉल स्कूलमध्ये मॉडेल बूथ उभारण्यात आलं होतं. श्रीनगरमधल्या व्हीआयपी एरियामधलं हे मतदान केंद्र. इथेच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला देखील मतदानाला येणार होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच सगळ्या मीडियाचा घोळका इथे जमायला सुरुवात झाली होती. पण मतदान सुरु झाल्यानंतर पुढचे दोन तास इथे मतदारांऐवजी सुरक्षारक्षकांचीच गर्दी जास्त दिसायला लागली. बऱ्याच वेळानंतर कुठून तरी एखाद दुसरी व्यक्ती मतदानासाठी यायची. गेटवर, शाळेच्या टेरेसवर सगळीकडे बंदुका ताणून उभे असलेले सैनिक. कंपाऊंडच्या बाहेरही सगळीकडे पोलिसांच्याच गाड्यांचा ताफा. दहा वाजता फारुख अब्दुल्ला आपले पुत्र ओमरसह मतदानाला आले, त्यावेळी जी काही थोडीफार लगबग सुरु झाली, मीडियासाठी बाईट वगैरे सोहळा पार पडला तेवढाच. बाकी दिवसभर पुन्हा तिथं मतदान सुरु आहे की नाही याबद्दल शंका यावी अशी स्थिती.

काश्मीरमध्ये 45 टक्के मतदान झालं. ही आकडेवारी वाचल्यावर श्रीनगरमधल्या या अवस्थेची कल्पना आपल्याला येत नाही. त्यासाठी हिंदूबहुल जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातलं श्रीनगर अशी विभाजित आकडेवारी पाहावी लागते. त्या दिवशी श्रीनगर आणि उधमपूर या दोन मतदारसंघांसाठी मतदान पार पडत होतं. उधमपूर हे जम्मू विभागात येतं. तिथे जवळपास 70 टक्के मतदान झालं. पण श्रीनगरमध्ये अवघं 14 टक्के. दोन वर्षांपूर्वी इथे झालेल्या पोटनिवडणुकीत अवघं 7 टक्के मतदान झालेलं होतं. त्या तुलनेत ही आकडेवारी वाढली असली, तरी समाधानकारक निश्चितच नव्हती.

काश्मीरमधल्या मतदानाची टक्केवारी ही इथल्या अशांततेची निदर्शक आहे. मागच्या पंचायत निवडणुकांमध्ये तर केवळ तीन ते चारच टक्के मतदान झालेलं होतं. अशा परिस्थितीत मतदानाला बाहेर पडणं म्हणजे आपण इथल्या चळवळीशी गद्दारी करतोय अशीही टोचण कुठेतरी लोकांना जाणवत असावी, त्यामुळेच निवडणूक लोकसभेची असली तरी कुठलाही उत्साह इथे पाहायला मिळत नव्हता. श्रीनगर आणि उधमपूर हे दोनही तसे हायप्रोफाईल मतदारसंघ. श्रीनगरमध्ये काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काँन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला रिंगणात तर उधमपूरमध्ये पीएमओचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह भाजपकडून उमेदवार.

जम्मू आणि काश्मीर या राज्यात लोकसभेच्या एकूण सहाच जागा आहेत. त्यामुळे इथे काय होतं याने राष्ट्रीय पक्षांना फारसा फरक पडत नसावा. पण प्रचारामध्ये याच काश्मीरशी निगडीत अनेक मुद्द्यांचा मात्र देशात इतरत्र वातावरण तापवण्यासाठी वापर केला जातो. मागच्या वेळी सहा जागांपैकी जम्मू या हिंदूबहुल भागातल्या तीन जागा भाजपनं, तर खोऱ्यातल्या 3 जागा पीडीपीनं जिंकलेल्या होत्या. यावेळी मात्र काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्सचं पारडं जड असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती.

एक वेगळी चर्चा ऐकायला मिळाली ती काश्मीर खोऱ्यात आपले पाय रोवण्यासाठी भाजपनं आपली रणनीती कशी बदललीय याची. भाजपच्या प्रचारात इथे पहिल्यांदाच हिरव्या रंगाचा सढळ हाताने वापर होत होता. पोस्टर, बॅनर, पेपरमधल्या जाहिराती या सगळ्यांमध्ये भाजपनं गडद हिरवा रंग जास्तीत जास्त वापरला होता. यावरुन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर टोलेबाजीही केली होती. भाजपनं आपला खरा रंग काश्मिरी जनतेपासून लपवू नये, अशी खोचक टीका त्यांनी केली होती. याबाबत भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांना विचारलं, तेव्हा त्यांनी हसत ही गोष्ट मान्य केली की यावेळी आम्ही पहिल्यांदाच हिरव्या रंगाचा मुक्त हस्ताने वापर करायचं ठरवलंय. पण हिरवा रंग कुठल्याही गोष्टीला 'ग्रीन सिग्नल' म्हणून वापरला जातो. त्याच अर्थानं आता काश्मिरमधल्या जनतेनं भाजपला ग्रीन सिग्नल दिलाय हेच आम्हाला सुचवायचं आहे. अर्थात तर्क म्हणून त्यांनी अशी जोडणी केली असली तरी त्यांच्या म्हणण्यात काही फारसा दम वाटत नव्हता. पण अल्ताफभाईंचा आत्मविश्वास मात्र वाखाणण्यासारखा होता. कमळ आणि केसर ही भाजपची दोन प्रतीकं सर्वात जास्त कुठे आढळतात तर ती या काश्मिरमध्येच हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

अस्वस्थ काश्मीरची निवडणूक अनुभवताना...

श्रीनगरमधल्या जवाहरनगर भागात भाजपचं कार्यालय आहे. कार्यालय आहे म्हणण्यापेक्षा इथून त्यांचं काम चालतं असंच म्हणायला हवं. कारण कार्यालय म्हणावं अशी या वास्तूची अवस्था नाही. एकतर बाहेर कुठेही पक्षाच्या नावाचा बोर्ड, झेंडा दिसत नाही. अगदी गुप्त पद्धतीनं इथे पक्षाचं काम चालवलं जात असल्याचं दिसतं. सुरक्षारक्षकानं दार उघडल्यावर आतमध्ये पाऊल टाकल्यावरच तुम्हाला भाजपचा झेंडा किंवा बॅनर दिसू शकतो. सध्या एका माजी आमदाराच्या सरकारी बंगल्यातच हे कार्यालय थाटलं गेलंय. नवीन कार्यालय एअरपोर्टवर मार्गावर तयार होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्य कक्षात वाजपेयी, अडवाणी, शामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह मोदी, शाहांच्याही तसबिरी दिसत होत्या. पण भाजपच्या देशभरातल्या कार्यालयामधे दिसतात तशा या फ्रेम नव्हत्या, तर कलर प्रिंटआऊट घेऊन त्या भिंतीवर चिकटवल्या होत्या.

खालिद जहांगीर या तरुणाला भाजपनं श्रीनगरमधून डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात रिंगणात उतरवलं आहे. 'खालिद है तो सॉलिड है' अशी त्यांच्या प्रचाराची टॅगलाईन शहरात सगळीकडे झळकताना दिसत होती. या घोषणेत एक आक्रमकपणा आहे, तो काश्मिरी जनतेला भावेल का, या प्रश्नावर भाजपच्याच अनेक नेत्यांनी अशी आक्रमक घोषणा आपल्याला रुचली नसल्याचं सांगितलं. 'काश्मिरमध्ये असा आक्रमकपणा चालणार नाही, पण काय करणार? वरुनच मंजूर झालंय सगळं', असं म्हणत त्यांनी आपली हतबलता दर्शवली.

अस्वस्थ काश्मीरची निवडणूक अनुभवताना...

भाजपच्या या उमेदवारासाठी जो स्थानिक जाहीरनामा तयार करण्यात आलाय, त्यात कुठेही 370, 35 ए चा साधा उल्लेखही दिसत नव्हता. त्याऐवजी दोन वेगळ्याच घोषणांनी लक्ष वेधून घेतलं. एक आश्वासन होतं बडगाम, गंदरबाल या ठिकाणी पीव्हीआर मल्टिप्लेक्स उभारु, असं आणि दुसरं होतं आयपीएलच्या धर्तीवर काश्मीर खोऱ्यासाठी एक क्रिकेट लीग आयोजित करु म्हणून. काश्मिरमध्ये बाॉलिवूड आणि क्रिकेटची जबरदस्त क्रेझ आहे. काश्मिरी तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाजप उमेदवारानं आपल्या जाहीरनाम्यात अशा वचनांचा समावेश केला असावा. काश्मिरी तरुणांच्या खऱ्या गरजा काय आहेत हेदेखील यातून स्पष्ट होत असावं.

काश्मीरमध्ये 370 कलम, 35 ए शिवाय निवडणुकीत चर्चा झाली ती हायवेवरच्या बंदीची. पुलवामा हल्ल्यानंतर लष्कराच्या वाहतुकीला कुठलाही धोका नको म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. आठवड्यातून बुधवार आणि रविवार या दोन दिवशी हायवेवर सामान्यांच्या वाहतुकीला बंदी, या दिवशी केवळ लष्कराचीच वाहने मार्गक्रमण करणार. या अजब निर्णयामुळे काश्मिरी जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. अँम्बुलन्स, पर्यटक यांना मज्जाव केला जाणार नाही, असं नियमामध्ये म्हटलं असलं तरी ते केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात या दिवशी अधिकारी अजिबात सोडत नाहीत, असा आरोप इथल्या अनेक टॅक्सीचालकांनी केला. अँम्बुलन्स जाऊ न दिल्यानं एका लहानग्या मुलीचा उपचाराविना मृत्यू झाल्याची बातमीही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये झळकली होती. कारगील युद्धाच्या वेळीही असे रस्ते बंद झाले नव्हते. मग आत्ताच हे करायची काय गरज आहे, असा त्यांचा सवाल होता. शिवाय लष्करही या निर्णयाच्या बाजूनं नसल्याचं ऐकायला मिळालं. कारण त्यांना असे केवळ आठवड्यातून दोनच दिवस नव्हे तर गरजेनुसार वाहतूक जास्त सोयीची ठरते. पण या दोन्हीही बाजू गृहीत न धरता मनमानी पद्धतीनं या निर्णयाची अंमलबजावणी सुरु आहे. आठवड्यातले दोन दिवस तुम्हाला सार्वजनिक रस्त्यावर जायला परवानगीच नाही दिली तर काय होईल याची कल्पना करुन बघा, मग काश्मिरी जनतेचे हाल समजू शकतील.

काश्मिरमधल्या या अशांततेचा इथल्या पर्यटन व्यवसायावरही मोठा परिणाम झालाय. त्यामुळेच दल सरोवरतल्या अनेक हाऊसबोट, शिकारा सुनसान पडलेल्या दिसतात. मार्च एप्रिलला इथल्या पर्यटन हंगामाची सुरुवात होते. आशिया खंडातलं सर्वात मोठं टयुलिप गार्डन श्रीनगरमध्ये आहे. वर्षातून केवळ एक महिनाच ते खुलं असतं. योगायोगानं आम्ही याच कालावधीत तिथे असल्यानं ते पाहायची संधी मिळाली. साधारण मार्च एंड किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे गार्डन खुलं होतं. 2008 साली काँग्रेस सरकारच्या काळात या गार्डनचं उद्घाटन झालं. काश्मीरच्या पर्यटन हंगामाचा कालावधी थोडासा अधिक वाढवावा, वसंताची चाहूल लागल्यावरच पर्यटक इथे आकर्षित व्हावेत ही या भव्य गार्डनमागची संकल्पना आहे. जवळपास 30 हेक्टर क्षेत्रावर वसलेल्या या गार्डनमध्ये 60 पेक्षा अधिक प्रजातींची 12 लाख फुलं पाहायला मिळतात. ट्युलिप पाहण्यासाठी युरोपला जाण्याची गरज नाही, शिवाय तिकडे तर केवळ पठारावर फुलं दिसतात. इथे मात्र समोर दल सरोवर, पाठीमागे पर्वतराजी अशा सगळ्या नेपथ्यात ट्युलिपची बाग फुलते. इथल्या फ्लोरिकल्चर अधिकाऱ्यांशी बातचीत करतानाही त्यांनी आवर्जून सांगितलं की काश्मीरसाठी पर्यटन हीच शांततेची चावी ठरु शकते. ज्या काश्मीर खोऱ्यात एकीकडे बंदुकीच्या गोळ्यांचा, ग्रेनेडच्या स्फोटांचा आवाज ऐकू येत असतो, त्याच काश्मीर खोऱ्यात ट्युलिपच्या फुलांची ही चादर शांततेचा संदेश देत सगळ्यांना काश्मीरची खरी ताकद दाखवू पाहतेय.

मतदानाच्या दिवशी दिवसभर श्रीनगर आणि परिसरात फिरत होतो, पण सगळे रस्ते सुनसान होते, दुकानं बंद होती. श्रीनगरमधला लाल चौक तर अगदी चिडीचूप. कुठल्याही बंदचा सर्वाधिक परिणाम याच लाल चौकात पाहायला मिळतो. श्रीनगरच्या बाहेरच्या भागांमध्ये फिरतानाही घरांवरच्या भिंतीवर 'GO INDIA GO' आणि BURHAN IS STILL ALIVE असे खडूनं मोठ्या अक्षरात गिरवलेले संदेश दिसत होते. काश्मीर कधीही न अनुभवलेल्या लोकांना हे पचनी पडणं अवघड जाऊ शकतं. पण जे डोळ्यासमोर दिसतं, तेवढचं बघून चालत नाही. त्याच्या पाठीमागे राजकारणाचे अनेक रंग दडलेले आहेत. त्यामुळेच रस्त्यानं या पाट्या पाहत जाताना विशाल भारद्वाजच्या हैदर चित्रपटात शाहीद कपूरच्या तोंडचं ते स्वगत आठवत राहतं...

किसका झूठ, झूठ है किसके सच में, सच नहीं है के है नहीं बस यही सवाल हैं और सवाल का जवाब भी सवाल हैं...

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget