पुन्हा कांद्याला आलं मार्केट, कुठं 3000 तर कुठं 4000 रुपयांचा दर, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) दिलासादायक बातमी आहे. सध्या कांद्याच्या दरात (Onion Price) वाढ होताना दिसत आहे.
Onion Price News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) दिलासादायक बातमी आहे. सध्या कांद्याच्या दरात (Onion Price) वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 25 जून रोजी राज्यातील 44 बाजार समित्यांमध्ये कांद्याचा लिलाव झाला. यापैकी 34 मध्ये 3000 ते 4200 रुपये प्रतिक्विंटल भाव होता. कोणत्याही बाजारात भाव 2500 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी नव्हता. दरम्यान, आवक कमी असल्यामुळं कांद्याच्या दरात वाढ होत आहे.
महाराष्ट्रात कांद्याचे दर रोज नवनवे विक्रम करत आहेत. राज्यात कांद्याचे भाव 4200 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. 25 जून रोजी नागपूरच्या रामटेक मंडईत केवळ कांद्याला विक्रमी किमान 4 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर कमाल दर हा 4200 रुपये तर सरासरी 4100 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. या बाजारात कांद्याची आवकही कमी झाली होती.
मोठ्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक कमी
केंद्र सरकारने 7 डिसेंबर 2023 पासून लागू केलेली निर्यातबंदी 4 मे रोजी उठवण्यात आली होती. यानंतर कांद्याची निर्यात होऊ लागली. देशांतर्गत बाजारपेठेतील आवक कमी होऊ लागली. आवक कमी झाल्याने भाव वाढले. यापूर्वीच महाराष्ट्रात यंदा कमी उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव-बसवंतमध्ये 18000 क्विंटल, लासलगाव-विंचूरमध्ये 12500, लासलगावमध्ये 11328 आणि सोलापुरात 11793 क्विंटल कांद्याची आवक झाली होती.
कोणत्या बाजारात किती दर?
पुणे बाजारात कांद्याला किमान भाव 1200 रुपये, तर कमाल भाव 3000 रुपये आहे.
अकोला बाजारात किमान भाव 2000 रुपये तर कमाल दर 3400 रुपये आहे.
पिंपळगाव बाजारात कांद्याचा किमान भाव 2700 रुपये तर कमाल दर 1700
राहुरी बाजारात कांद्याचा किमान भाव 2301 रुपये, कमाल भाव 2326 रुपये आणि उच्च प्रतीचा कांदा 4313 रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय.
सध्या शेतकऱ्यांकडे कमी कांदा शिल्लक
सध्या कांद्याच्या दरात वाढ होत असतानाचे चित्र दिसत असले तरी शेतकऱ्यांकडे मात्र कांदा शिल्लक नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. मात्र, सध्या ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे, त्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक होता, त्यावेळेस सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळं कांद्याचे दर खूप कमी आले होते. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक नाही, त्यावेळी सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)