Uddhav Thackeray VIDEO : हरामखोर आहेत ते! उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
Disha Salian Case : भाजपचे नेते राम कदम यांनी दिशा सालियन प्रकरणावर नव्याने प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर विधीमंडळात या मुद्द्यावरून गोंधळ झाल्याचं दिसून आलं.

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणावरून पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरेंचं आगमन झालं होतं. त्यावेळी वरूण सरदेसाईंशी चर्चा करताना 'हरामखोर आहेत ते' असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता उद्धव ठाकरे कुणाला हरामखोर म्हणाले, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
यंदाच्या अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणावर गोंधळ झाल्याचं दिसून आलं. या आधी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले. त्यानंतर आज भाजपचे आमदार राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना अनेक आरोप केले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा पुन्हा तपास करावा अशी मागणी त्यांनी केली. सुशांतसिंह राजपूत मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घराची रातोरात रंगरंगोटी कुणी केली असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच या प्रकरणी बिहारचे पोलिस तपासासाठी मुंबईत आल्यानंतर त्यांना सहकार्य न करता माघारी का पाठवलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे संतापले
दिशा सालियन प्रकरणावरून गोंधळ होत असताना उद्धव ठाकरे विधीमंडळाच्या परिसरात आले. त्यावेळी सभागृहात जात असताना त्यांनी आमदार वरुण सरदेसाई यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरेंनी वरुण सरदेसाई यांना काहीतरी विचारलं. त्यावर वरुण सरदेसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 'हरामखोर आहेत ते' असं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य हे माध्यमांच्या कॅमेरामध्ये कैद झालं.
भाजप नेते राम कदमांना उद्देशून वक्तव्य?
दिशा सालियन आणि सुशांत सिहं राजपूत प्रकरणी राम कदम यांनी काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना उद्देशून हरामखोर हा शब्द वापरला की काय अशी चर्चा सुरू झाली. पण उद्धव ठाकरे यांनी हरामखोर असं नेमकं कुणाला म्हटलं हे मात्र स्पष्ट होत नाही. ते भाजपच्या कोणत्या नेत्याला उद्देशून होतं हे स्पष्ट होत नाही.
उद्धव ठाकरेंना त्राय का होतोय? राम कदमांचा सवाल
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्यानंतर त्याच्या घराची रातोरात रंगरंगोटी करण्यात आली. ते कशासाठी केलं गेलं? बिहारच्या पोलिसांना सहकार्य का केलं नाही? त्या वेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्यामध्ये काही संबंध नसल्यास त्यांना त्रास का होतोय? कर नाही तर डर कशाला पाहिजे. पण उद्धव ठाकरेंची एकंदरीत बॉडी लँग्वेज पाहिली असता त्यांना त्रास होतोय हे स्पष्ट झालंय.
ही बातमी वाचा:
























