(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agricultural News : शेतमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांच्या निर्यातीत मोठी वाढ, एप्रिल ते जून महिन्यातील आकडेवारी जाहीर
भारतातील शेतमाल (Agricultural goods) आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची निर्यातीत वाढ (Processed foods exports) झाली आहे.
Agricultural News : भारतातील शेतमाल (Agricultural goods) आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची निर्यातीत वाढ (Processed foods exports) झाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 31 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ 7 हजार 408 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली आहे. या काळात, फळे आणि भाजीपाला, तृणधान्ये, मांस-मासे आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांच्या निर्यातीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, मागील वर्षीचा कल कायम राखत यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यात शेतमाल तसेच प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. एप्रिल ते जून या ती महिन्यांच्या कालावधीत निर्यातीत 31 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. सांख्यिकी महासंचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. अपेडाच्या उत्पादनांची गेल्या वर्षीच्या एप्रिल ते जून या काळात 5 हजार 663 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची एकंदर निर्यात झाली होती. तर यावर्षी त्याच कालावधीत 7 हजार 408 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची निर्यात झाली आहे. एप्रिल ते जून 2022-23 या काळासाठी 5 हजार 890 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. त्यापेक्षा अधिक निर्यात झाली आहे.
प्रक्रियायुक्त फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत 59.71 टक्क्यांची वाढ
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील अपेडा म्हणजेच कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळं या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातून 31 टक्के निर्यातीचे उद्दिष्ट गाठण्यात मदत झाली आहे. वर्ष 2022-23 मध्ये शेतमाल तसेच प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांच्या निर्यातीसाठी अपेडाने 23.56 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. सांख्यिकी महासंचालनालयाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, एप्रिल ते जून 2022-23 या काळात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ताजी फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत 4 टक्के तर प्रक्रियायुक्त फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत 59.71 टक्क्यांची भरीव वाढ नोंदविण्यात आली आहे. तसेच, तृण धान्यांसारखी प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या इतर वस्तू यांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या याच काळातील निर्यातीच्या तुलनेत 37.66 टक्के वाढ झाली आहे.
एप्रिल ते जून 2021 या काळात, 394 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किंमतीची ताजी फळे आणि भाजीपाला यांची निर्यात झाली होती. तर चालू आर्थिक वर्षातील त्याच काळात ही निर्यात 409 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 490 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किंमतीची प्रक्रियायुक्त फळे व भाजीपाला यांची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 307 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची प्रक्रियायुक्त फळे व भाजीपाला यांची निर्यात करण्यात आली होती.
बासमती तांदळाच्या निर्यातीत 25.54 टक्क्यांची वाढ
2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात बासमती तांदळाच्या निर्यातीत 25.54 टक्के वाढ झाली आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीत 922 दशलक्ष डॉलर (एप्रिल-जून 2021) वरून 1 हजार 157 दशलक्ष डॉलर (एप्रिल-जून 2022) एवढी वाढ झाली आहे. तर बासमती वगळता इतर तांदळाच्या उत्पादनात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 5 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. बासमती वगळता इतर तांदळाची निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत 1 हजार 566 दशलक्ष डॉलर एवढी झाली आहे. जी मागील वर्षाच्या याच तिमाहीत 1 हजार 491 दशलक्ष डॉलर एवढी होती.
मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीत 9.5 टक्क्यांची वाढ
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीत 9.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर इतर धान्यांच्या निर्यातीत 29 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. एकट्या दुग्धजन्य उत्पादनांनी 67.15 टक्के वाढ नोंदवल्याचे दिसून येते. कारण या उत्पादनांची निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत 191 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या याच तिमाहीत 114 दशलक्ष डॉलर्स एवढी होती. तसेच इतर धान्यांची निर्यात एप्रिल-जून 2021 मध्ये 237 दशलक्ष डॉलर्स वरुन एप्रिल-जून 2022 मध्ये 306 दशलक्ष डॉलर्स एवढी झाली आहे. तर पशुजन्य उत्पादनांची निर्यात एप्रिल-जून 2021 मध्ये 1022 दशलक्ष डॉलर्सवरून एप्रिल-जून 2022 मध्ये 1120 दशलक्ष डॉलर्स इतकी वाढली असल्याचे दिसते.
निर्यातीला चालना देण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान
देशातील दुर्लभ उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आम्ही कृषी उत्पादने मूल्य साखळीतील विविध भागधारकांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य प्रदान करत असल्याचे मत कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पादने निर्यात प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू यांनी व्यक्त केले. दरम्यान, वाणिज्यिक माहिती आणि सांख्यिकी महानिदेशालयच्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये देशाच्या कृषी उत्पादनांची निर्यात 19.92 टक्क्यांनी वाढून तब्बल 50.21 अब्ज डॉलर्स झाली आहे. 2020-21 मध्ये गाठलेल्या 41.87 अब्जच्या 17.66 टक्क्यांहून अधिक वाढीचा दर लक्षणीय आहे. उच्च माल वाहतुकीचे दर आणि कंटेनर टंचाई अशी दळणवळणाशी निगडित अभूतपूर्व आव्हाने समोर असतानाही ही वाढ झाली हे कौतुकास्पद आहे.
महत्त्वाच्या बातम्या: