Sugar Export : 2021-22 मध्ये भारतातून 100 लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात, केंद्र सरकारची माहिती
वर्ष 2021-22 मध्ये 100 लाख मेट्रिक टन साखर निर्यात केली आहे. तर 35 लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल निर्मितीकरता वापरण्यात आली आहे.
Sugar Export : भारत आता साखरेचा (Sugar) सर्वात मोठा उत्पादक आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातदार (Export) देश झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील साखरेचे उत्पादन देशांतर्गत वापरापेक्षा सातत्यानं जास्त होत असून, त्यामुळं अतिरिक्त साखरेची निर्मिती झाली आहे. वर्ष 2021-22 मध्ये 100 लाख मेट्रिक टन साखर निर्यात केली आहे. तर 35 लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल निर्मितीकरता वापरण्यात आली आहे.
अतिरिक्त साखरेच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी गेल्या काही साखर हंगामापासून केंद्र सरकार, साखर कारखान्यांना अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यामुळं साखर कारखान्यांची वित्तीय तरलता सुधारुन साखर कारखानदारांना शेतकऱ्यांची ऊस दराची थकबाकी देता येईल. अलीकडे साखरेची निर्यात आणि इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा वापर यामुळं साखरेच्या मागणी आणि पुरवठ्यामधील संतुलन राखण्यात आणि देशांतर्गत साखरेच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत झाली आहे.
1 ऑगस्ट 2022 पर्यंत सुमारे 100 लक्ष मेट्रिक टन साखरेची निर्यात
सध्या अन्न धान्याच्या महागाईबद्दल सरकारला चिंता भेडसावत आहे. त्यामुळं, देशांतर्गत वापरासाठी साखरेची वाजवी दरात पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, सरकारने मे 2022 मध्ये 100 लक्ष मेट्रिक टन पेक्षा जास्त साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. निर्यातदार तसेच साखर कारखान्यांना जून, 2022 मध्ये निर्यातीसाठी 10 लक्ष मेट्रिक टन पर्यंत निर्यात प्रकाशन आदेश (EROs) जारी करण्यात आले होते. त्यानुसार 1 ऑगस्ट 2022 पर्यंत सुमारे 100 लक्ष मेट्रिक टन साखरेची निर्यात झाली आहे.
ऑक्टोबर 2022 च्या मध्यापासून नवीन साखर बाजारात येण्यास सुरुवात होणार
मे 2022 मध्ये निर्बंध लागू झाल्यापासून साखरेचे उत्पादन वाढणे आणि देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या कमी मागणीमुळं साखरेचा वापर कमी होणे अशा प्रकारचे बदल ,साखरेच्या साठ्याच्या स्थितीत झाले आहेत. उसाचे गाळप साधारणपणे ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होते. मात्र, उसाच्या पुरेशा उपलब्धतेमुळं, आगामी साखर हंगाम 2022-23 मध्ये ऊसाचे गाळप ऑक्टोबर 2022 च्या पहिल्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2022 च्या मध्यापासून नवीन साखर बाजारात येण्यास सुरुवात होईल. त्यामुळं आगामी साखर हंगामात 60 लाख मेट्रीक टन साखरेचा साठा खुला करणे साखरेचे देशांतर्गत भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे असणार आहे.
किरकोळ भाव स्थिर राहण्याची शक्यता
दरम्यान, जुलै 2022 च्या शेवटच्या आठवड्यात सरकारने यासंदर्भातील स्थितीचा आढावा घेतला होता. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हितासाठी 112 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 112 लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात झाल्यानंतरही, 60 लाख मेट्रिक टन साखरेचा राखीव साठा (क्लोजिंग स्टॉक ) कायम ठेवला जाईल. आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये ऊस गाळप ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होईल. देशात रास्त दरात साखरेची पुरेशी उपलब्धता असेल आणि किरकोळ भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे.
चालू साखर हंगामात 1.ऑगस्ट 2022 पर्यंत 100 लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात केल्यानं साखर कारखान्यांची तरलता 33,000 कोटी रुपयांद्वारे सुधारण्यात मदत झाली. त्यामुळं त्यांना शेतकर्यांची उसाच्या थकबाकीची रक्कम चुकती करता आली. आगामी 12 लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीमुळे साखर कारखान्यांची तरलता 3600 कोटी रुपयांच्या माध्यमातून सुधारण्यास मदत होईल.
महत्त्वाच्या बातम्या: