ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनपा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान संजय राऊतांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे.
Maharashtra Municipal Elections : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) आता साऱ्यांना महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच महाविकास आघाडीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गट महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. एकदा आम्हाला पाहायचंच आहे, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. कारण मुंबई, ठाणे नागपूर मध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतोय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. दरम्यान संजय राऊतांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनीही प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे.
संजय राऊतांच्या वक्तव्याशी पूर्णपणे सहमत- आमदार विकास ठाकरे
मनपा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय जर हा महाविकास आघाडीचा असेल तर तो सर्वांना मान्य असेल. परंतू नागपुरात तरी काँग्रेस हा पक्ष सर्वात निवडणुका स्वबळावर लढत आला आहे. तसेच काँग्रेस पक्षाला प्रत्येक बुथवर चांगले मतदान होत आला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर आम्हाला कुठलीही हरकत नाही. सोबतच त्यांनी कार्यकर्त्यांबाबत संधी मिळत नसल्याच्या वक्तव्यावर मी सहमत आहे. ती खरी गोष्ट असून पक्ष वाढीसाठी या निवडणुका स्वबळावरच लढल्या पाहिजेत. अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याला सहमती दिली आहे. पक्ष वाढीच्या संदर्भात त्यांचे जे विचार आहेत ते योग्यच आहे. कारण कार्यकर्त्यांची एक प्रकारे ओरड असते की आम्हाला संधी मिळत नाही. मुळे स्वबळावर लढल्यास बरं होईल असे मतही त्यांनी व्यक्त केले. नागपूर जिल्ह्याचा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने मी माझे वैयक्तिक मत व्यक्त केले आहे. यापूर्वी नागपूर शहराचा महापौर म्हणूनही मी काम केले आहे. अनेक वर्षापासून मी संघटनेचे काम करत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचे जे मत आहे ते मी वैयक्तिकरित्या आपल्यासमोर मांडले आहे. अशी स्पष्टोक्ती ही त्यांनी यावेळी दिली.
चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा : जितेंद्र आव्हाड
संजय राऊत यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी शी बोलताना म्हणाले, त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण पण आपण एकत्रित विधानसभेत झालेल्या पराभवा नंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होतं असं माझं तरी मत आहे त्याच्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतोय ग्राउंड वरती कार्यकर्त्यांचे मत काय आहे हे आम्हालाही माहिती आहे त्याच्यामुळे हा निर्णय योग्य आहे असं मला वाटत नाही ठीक आहे त्यांचा पक्ष आहे त्यांनी निर्णय घ्यावा शेवटी बळच कोणालातरी सोबत घेऊन जाणे हे आम्हालाही पटणार नाही किंवा शोभणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केल आहे.
आणखी वाचा