South Africa vs Pakistan 1st Test : पाकिस्तानला पाणी पाजत दक्षिण आफ्रिकेची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये थाटात एन्ट्री! आता एका जागेसाठी तिघांची स्पर्धा, भारतासाठी काय समीकरण?
दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु इतर संघाची प्रतीक्षा कायम आहे. आता तीन संघ एका जागेसाठी स्पर्धेत आहेत.

South Africa vs Pakistan 1st Test : दक्षिण आफ्रिकेने चमकदार कामगिरी करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने सेंच्युरियन कसोटीत पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव करून ही कामगिरी केली. या सामन्यात आफ्रिकन संघाला विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी खेळाच्या चौथ्या दिवसाच्या (29 डिसेंबर) दुसऱ्या सत्रात पूर्ण केले. दक्षिण आफ्रिका प्रथमच WTC फायनलमध्ये पोहोचली आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने एकेकाळी 99 धावांत आठ विकेट गमावल्या होत्या. येथून मार्को जॅनसेन आणि कागिसो रबाडा यांनी 51 धावांची नाबाद भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या मंजुरापर्यंत नेले. रबाडा 31 तर जॅनसेन 16 धावांवर नाबाद राहिला. वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बासने दुसऱ्या डावात सहा विकेट घेत पाकिस्तानला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र जॅनसेन-रबाडाने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. आता उभय संघांमधील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु इतर संघाची प्रतीक्षा कायम आहे. आता तीन संघ एका जागेसाठी स्पर्धेत आहेत. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा समावेश आहे. न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज आधीच अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहेत. WTC च्या सध्याच्या सायकलचा अंतिम सामना पुढील वर्षी 11 ते 15 जून दरम्यान लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे.
भारतासाठी फायनलचे समीकरण
- भारताला अंतिम फेरीत सहज पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही कसोटी (मेलबर्नसह) जिंकाव्या लागतील. भारतीय संघाने एकही सामना ड्रॉ केला किंवा हरला तर त्याला इतर निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
- जर भारतीय संघाने मालिका 2-1 ने जिंकली, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मायदेशातील मालिकेत श्रीलंकेने किमान एक सामना अनिर्णित ठेवण्याची आशा करावी लागेल.
- ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिल्यास भारत 55.26 टक्के गुणांवर पूर्ण करेल. अशा परिस्थितीत श्रीलंकेने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 किंवा 2-0 अशी जिंकली तरच भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल.
- मेलबर्न आणि सिडनी कसोटी अनिर्णित राहिल्यास भारतीय संघ 53.51 गुणांवर पूर्ण करेल. अशा स्थितीत श्रीलंकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-0 ने जिंकली किंवा 0-0 अशी बरोबरी सोडली तरच भारत अंतिम फेरीत पोहोचेल.
- श्रीलंकेविरुद्धची मालिका 0-0 अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलियाचे भारतासारखे 53.51 टक्के गुण होतील. मात्र या चक्रात भारत अधिक मालिका जिंकण्याच्या जोरावर पुढे असेल. श्रीलंकेने मालिका 2-0 ने जिंकली तर ते भारताच्या पुढे जाईल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे ही तिसरी सायकल आहे जी 2023 ते 2025 पर्यंत चालेल. आयसीसीने या तिसऱ्या सायकलसाठी पॉइंट सिस्टमशी संबंधित नियम आधीच जारी केले आहेत. कसोटी सामना जिंकल्यास संघाला 12 गुण, सामना अनिर्णित राहिल्यास 4 गुण आणि सामना बरोबरीत सुटल्यास 6 गुण मिळतील. त्याच वेळी, सामना जिंकण्यासाठी 100 टक्के, टायसाठी 50 टक्के, ड्रॉसाठी 33.33 टक्के आणि पराभवासाठी शून्य टक्के गुण जोडले जातात. दोन सामन्यांच्या मालिकेत एकूण 24 गुण उपलब्ध आहेत आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 60 गुण उपलब्ध आहेत. पॉइंट टेबलमधील रँकिंग प्रामुख्याने विजयाच्या टक्केवारीच्या आधारे निश्चित केली जाते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
