(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel Hamas War : करो किंवा मरोची परिस्थिती! इस्रायली सैनिकांनी गाझामध्ये फडकावला झेंडा युद्धात आतापर्यंत 9000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू
Israel Palestine Conflict : हमास आणि इस्रायली सैनिक यांच्यातील युद्ध अत्यंत गंभीर होताना दिसत आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत 9000 हून अधिक लोकांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Israel Hamas War : इस्रायल आणि पॅलेस्टिनी (Israel Palestine Conflict) यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज या युद्धाचा 23 वा दिवस आहे. या संघर्षामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने हमासविरोधातील हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायली सैनिकांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दावा केला जात आहे की, इस्रायली सैनिकांनी गाझा पट्टीत (Gaza Strip) इस्रायली ध्वज (Flag of Israel) फडकवला आहे. याचा व्हिडीओ इस्रायली पत्रकार हनन्या नफ्तालीने एक्सवर शेअर केला आहे.
युद्धात आतापर्यंत 9000 हून अधिक लोकांचा मृत्यू
हमास आणि इस्रायल दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरुच आहेत. बॉम्बफेक आणि हवाई हल्ल्यांसोबत जमिनीवरही हमास आणि इस्रायली सैनिक यांच्यात युद्ध होताना दिसत आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत 9000 हून अधिक लोकांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचं म्हटलं आहे. आम्ही सध्या करो या मरोच्या परिस्थिती आहोत, असंही नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे.
हा युद्धाचा दुसरा टप्पा : पंतप्रधान नेतान्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी सांगितलं आहे की, 'शनिवारी संध्याकाळी आमच्या सैन्याच्या अतिरिक्त तुकड्या गाझामध्ये दाखल झाल्या. हा युद्धाचा दुसरा टप्पा आहे. याचे स्पष्ट ध्येय म्हणजे हमास सैन्याचा नाश आणि आमच्या ओलीसांची सुरक्षित सुटका. युद्ध मंत्रिमंडळ आणि सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही एकमताने ग्राउंड ऑपरेशन्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.' या पार्श्वभूमीवर इस्रायलने आता गाझा पट्टीत बेछूट हल्ला सुरु केला आहे. हमासच्या संपूर्ण नायनाट करणे, हेच इस्रायली सैन्याचं उद्दिष्ट आहे.
करो किंवा मरो अशी परिस्थिती : पंतप्रधान नेतान्याहू
हमासविरुद्ध सुरू असलेले हे युद्ध दीर्घकाळ चालणार असून अत्यंत कठीण असेल, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं आहे. मीडियाशी बोलताना नेतान्याहू म्हणाले, ''असे काही क्षण येतात जेव्हा एखाद्या राष्ट्राला दोन शक्यतांचा सामना करावा लागतो, ते म्हणजे करे किंवा मरो. आता आम्ही त्याच परीक्षेतून जात आहोत आणि ते कसे संपेल यात मला शंका नाही. आम्ही हे संपवू आणि आम्हीच विजेते होऊ.''
दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी 200 हून अधिक इस्रायली नागरिकांना बंधक बनवून ठेवलं आहे. इस्रायली हमासने ओलिस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेची मागणी करत आहे. तर दुसरीकडे, हमासने ओलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायलसमोर अट ठेवली आहे. इस्रायलने सर्व पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी आणि त्या बदल्यात ओलीस ठेवलेल्या सर्व इस्रायली नागरिकांना सोडावे, अशी हमासची मागणी आहे.