Ashadhi Wari 2024 : आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा पंढरीत, 30 दिवसात 600 किमी अंतर कापून हजारो भाविक दाखल
Ashadhi Wari 2024 : मुक्ताबाई यांची पालखी पंढरपुरात आल्यानंतर त्यांच्या पादुकांना चंद्रभागेचे स्नान घालून पालखी सोहळा त्यांच्या दत्त घाटावरील मुक्ताबाई मठात विसावला.
सोलापूर : आषाढी महासोहळ्यासाठी (Ashadhi Wari 2024) राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत असताना पहिला मानाचा पालखी सोहळा पंढरीत दाखल झाला आहे. सर्वच पालखी सोहळे वारकरी संप्रदायासाठी पूजनीय असले तरी मानाच्या समजल्या जाणाऱ्या सात पालख्यातील संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा (Sant Muktabai Palkhi Sohla) रविवारी पंढरपूर मध्ये दाखल झाला आहे.
तापी तीरावरून आलेल्या या पालखी सोहळ्याने गेल्या 30 दिवसात जवळपास 600 किलोमीटरचे अंतर पायी कापले आहे. दोन वर्षापूर्वी या पालखी सोहळ्याने वाट सरळ करताना 11 दिवसांचा आणि 150 किलोमीटरचे अंतर कमी केल्याने वारकऱ्यांना प्रवास सुसह्य झाला आहे .
संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान भगिनी, संत मुक्ताबाई महिला संत असल्याने या पालखी सोहळ्यात 1200 महिला आणि 1000 पुरुष भाविक सामील झाले आहेत. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि मध्यप्रदेशातून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सामील झाले आहेत.
पालखी मार्गात अनेक अडचणी आल्या तरी विठुरायाच्या ओढीने यावर मात करत हे भाविक आज पंढरपूरमध्ये पोचले. संत मुक्ताबाई या संत नामदेवांचे आजेगुरु असल्याने या पालखी सोहळ्याच्या स्वागताला संत नामदेवांचे वंशज केशवदास महाराज पोचले होते. या स्वागतानंतर मुक्ताबाई यांच्या पादुकांना चंद्रभागेचे स्नान घालून पालखी सोहळा त्यांच्या दत्त घाटावरील मुक्ताबाई मठात विसावला.
आषाढी एकादशी कधी? (Ashadhi Ekadashi 2024)
यंदा आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी असणार आहे. मात्र, पंचांगानुसार ही तिथी 16 जुलै रोजी रात्री 8 वाजून 33 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 17 जुलै रोजी रात्री 9 वाजून 33 मिनिटांनी याचं समापन होईल.
हिंदू पंचांगानुसार, आषाढी एकादशीची तिथी ही फार पवित्र मानली जाते. खरंतर, आषाढ महिना सुरु होण्याआधीच वारकऱ्यांना आपल्या विठु-माऊलीचे दर्शन घेण्याचे वेध लागतात. या निमित्ताने ठिकठिकाणांहून पालख्या देखील निघतात. या पालखी सोहळ्यात रिंगण, टाळ-मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत वारकरी आपली वाट धरतात.
यावर्षी आषाढी एकादशी 17 जुलै रोजी होत असून यात्रेत यंदा प्रथमच अगदी भंडीशेगावपासून पंढरपूर शहरापर्यंत ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यंदाची आषाढी एकादशी आजपर्यंतच्या आषाढीतील बेस्ट असेल असा विश्वास सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला.
ही बातमी वाचा :