![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त
Ashadhi Wari 2024 : एकीकडे भाविक तासंतास रांगेमध्ये राहून दर्शनाची वाट पाहत असताना,कुणाचीतरी ओळख काढून येणाऱ्या व्हीआयपी लोकांमुळे सर्वसामान्यांना आणखीच ताटकळत राहावं लागतंय.
![वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त Ashadhi Wari send VIPs to Darshan queue like us common people devotees angry in Pandharpur mandir management marathi वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/08/4d8875d14826c9b1283e9a1fa8379e35168619732958088_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : आषाढी सोहळ्याला आज तब्बल 10 दिवसांचा अवधी असताना आज विठुरायाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूर येथील दहाव्या पत्राशेडमध्ये गेली असून दर्शनाला तासंतास अवधी लागत आहे. त्यामुळे घुसखोरी करून दर्शन घेणाऱ्या व्हीआयपी लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा अशी संतप्त मागणी दर्शन रांगेतील भाविकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
खरेतर आजपासून देवाचा पलंग निघाल्याने 24 तास दर्शन सुरु झाले आहे. मात्र तरीही हजारोंच्या संख्येने वारकरी दर्शनासाठी दाखल होऊ लागल्याने दर्शनाची रांग गोपालपूरच्या पत्राशेड भरून पुढे निघाली आहे. सकाळी 6 पासून दर्शन रांगेत बसलेले भाविक अजूनही गोपाळपूर पत्राशेडमध्येच असल्याने भाविक संतप्त होऊ लागले आहेत.
व्हीआयपी लोकांचे लोंढे दर्शनासाठी
मंदिर परिसरात तथाकथित व्हीआयपी लोकांचे लोंढे कोणाची तरी ओळख काढत झटपट दर्शनासाठी घुसखोरी करीत असल्याने दर्शन रांगेतील भाविकांना तसेच ताटकळत थांबावे लागत आहे. यात मोठ्या प्रमाणात वृद्ध आणि लहान महिला असल्याने या भाविकांनी आता आषाढी वारी होईपर्यंत कोणत्याच व्हीआयपी मंडळींना दर्शनासाठी मधून सोडू नका अशी मागणी केली आहे.
आम्ही आमचे शेत, घरदार सोडून इथे देवाच्या दर्शनासाठी आलो, तर मग देवाच्या दारात हा भेदभाव कशाला हवा असा सवाल हे संतप्त भाविक करू लागले आहेत. यात महिलाही असून तुमच्या व्हीआयपींना आमच्यासारखे रांगेत पाठवा अशा भाषेत मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे.
मंदिर समिती सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद केल्याचे सांगितले असले तरी मंदिराच्या विविध दारातून या तथाकथित व्हीआयपींची गर्दी हटायला तयार नाही. त्यामुळेच दर्शन रांगेतील गोरगरीब भाविक मात्र तसाच रांगेत ताटकळत उभा आहे .
याचा सगळा रोष शासन आणि मुख्यमंत्र्यांवर काढण्यास भाविकांनी सुरुवात केल्याने किमान आतातरी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सक्त सूचना कराव्यात, आषाढी यात्रा संपेपर्यंत कोणत्याही बड्या भाविकांना घुसखोरी करून दर्शन देऊ नका अशी ताकीद दिल्यास आषाढीच्या या गोरगरीब भाविकांना वेळेत दर्शन मिळू शकेल.
17 जुलै रोजी आषाढी
यावर्षी आषाढी एकादशी 17 जुलै रोजी होत असून यात्रेत यंदा प्रथमच अगदी भंडीशेगावपासून पंढरपूर शहरापर्यंत ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यंदाची आषाढी एकादशी आजपर्यंतच्या आषाढीतील बेस्ट असेल असा विश्वास सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)