First Women Maharashtra Kesari : वीज बिल न भरल्यामुळे क्रीडा संकुल परिसर अंधारात, महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील स्पर्धकांची गैरसोय
First Women Maharashtra Kesari : पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. कारण जिथे ही स्पर्धा भरली आहे तो सांगलीतील क्रीडा संकुलचा परिसर अंधारात आहे.
First Women Maharashtra Kesari : सांगलीमध्ये (Sangli) महिलांची महाराष्ट्र केसरी (Women Maharashtra Kesari) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. परंतु या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. कारण जिथे ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरली आहे तो सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलचा (Sports Complex) परिसर अंधारात आहे. विशेष म्हणजे महिलांच्या कुस्ती स्पर्धा सुरु असताना देखील संकुल परिसर अंधारातच राहिला होता.
वीज बिल न भरल्यामुळे क्रीडा संकुल परिसर अंधारात
विजेचं बिल (Electricity Bill) न भरल्यामुळे क्रीडा संकुलाचा परिसर अंधारात राहिल्याचं समोर आलं आहे. परंतु यामुळे महिला मल्लांना (Wrestler) अंधारातून वाट काढावी लागली. स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे 400 ते 450 मुलींची यामुळो मोठी गैरसोय झाली. एवढी मोठी स्पर्धा भरवली जात असताना विजेचं बिल न भरल्यामुळे क्रीडा संकुल परिसर अंधारात राहिल्यामुळे फारच नाचक्की झाल्याचं पाहायला मिळालं.
सांगली महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा
दरम्यान, सांगलीत महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कालपासून (23 मार्च) या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. तर आज (24 मार्च) संध्याकाळी सहा वाजता अंतिम कुस्ती होईल. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या थराराला सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून चारशेहून अधिक महिला मल्ल सहभागी झाल्या आहेत.
पहिल्यांदाच सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे. काल सकाळी महिला कुस्तीगीरांची वजने घेण्यात आली. तर सायंकाळी आणि आज स्पर्धा पार पडणार आहेत. 24 मार्च म्हणजेच, आज सायंकाळी सहा वाजता अंतिम कुस्ती होईल. स्पर्धेसाठी राज्यभरातून 45 संघांतून सुमारे 400 ते 450 स्पर्धक सहभागी झाले आहेत. महापालिकेच्या संघांचाही यात सहभाग आहे. राज्यभरातील संघांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. विजेत्यांना चांदीची गदा आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा
दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 किलो वजनी गटातील महिला मल्ल सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्र केसरीसाठी 65 किलो वजनी गटावरील मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत 45 जिल्ह्याचे संघ सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा देण्यात येणार आहे. ही स्पर्धा फक्त मॅटवर होत आहे.
VIDEO : Sangli : वीजबिल न भरल्याने क्रीडा संकुल अंधारात, महिला मल्लांची गैरसोय ABP Majha